SHARE

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी ३ मारेकऱ्यांना शुक्रवारी पहाटे मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. अटक आरोपींमध्ये डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्ररणातील आरोपी सचिन अंदूरे याचाही समावेश आहे.

‘इथून’ घेतलं ताब्यात

अंदूरे याला पुणे येथील तुरूंगातून, तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड तुरूंगातून ताब्यात घेण्यात आलं. शुक्रवारी या तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंदूरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक आरोपीची संख्या १२ झाली आहे.

कधी झाली होती हत्या?

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर ४ दिवसांनी म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

दोषारोपपत्र सादर

कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने २०१६ मध्ये समीर गायकवाड (३५) याला अटक केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान  तावडे याचा पानसरे यांच्या हत्येमध्येही सहभाग असल्याचं पुढं आल्यावर त्याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

याप्रकरणी एसआयटीकडून ४ संशयीतांवर ४०० पानांचं पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं असून आतापर्यंत ८ संशयित आरोपींची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे.

 


हेही वाचा-

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते? हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांना सुनावलं

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, १८ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या