५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी प्रवासासाठी तिकीट दलालानं एका रेल्वे प्रवाशाला ५ हजार ५०० रुपयांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक
SHARES

लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी प्रवासासाठी तिकीट दलालानं एका रेल्वे प्रवाशाला ५ हजार ५०० रुपयांना दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजयकुमार दुबे या तिकीट दलाल याला फसवणूक केल्यानं अटक केली आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी या प्रवासासाठी सामान्य डब्याचे तिकीट ५५५ रुपये आहे. परंतु, हेच तिकीट प्रवाशाला संजयकुमार दुबे यानं ५ हजार ५०० रुपयांना दिलं.

मोहम्मद शरीफ असं प्रवाशांचं नाव आहे. मोहम्मद शरीफ यांना लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुवाहाटीला कामानिमित्त तातडीनं जायचं होतं. तात्काळ प्रवासासाठी मोहम्मद हे तिकीटघराकडे गेले. मात्र, त्यावेळी तिकीट दलाल दुबे यानं मोहम्मद याच्याकडं जात त्यांना कुठे जायचं आहे, आरक्षित तिकीट आहे का, असं विचारलं. यावेळी मोहम्मद यांनी तिकीट काढण्यासाठी जात असल्याचं तिकीट दलाल संजयकुमार दुबे यांला सांगितलं. त्यावेळी दुबेनं मोहम्मद शरीफ यांना 'आरक्षित तिकीट काढून देतो', असं सांगतिलं.

यावेळी तिकीट दलाल दुबे यानं 'तिकिटाचे १ हजार २०० रुपये आणि ५०० रुपये जास्त लागतील’, असं सांगितलं. मोहम्मदनं १ हजार ५०० रुपये देऊन उर्वरित २०० रुपये नंतर देईन, असं त्याला सांगितलं. यानंतर तिकीट दलाल दुबे तेथून काही वेळ नाहीसा झाला. काही वेळानं येऊन रेल्वेचा आरक्षित फॉर्म भरून ओळखपत्र घेतलं आणि एसी डब्याचं तिकीट मिळत असल्याचं मोहम्मद शरीफ यांना सांगितलं. तसंच, त्यासाठी आणखी २ हजार रुपये लागणार असल्याचं सांगितलं.

त्यानंतर तिकीट दलाल पुन्हा नाहीसा झाला. पुन्हा येऊन १ हजार रुपये जास्त लागणार आहेत, असे सांगू लागला. या वेळी मोहम्मदने १ हजार रुपये देऊन त्याचे तिकीट आणून दिले. त्याशिवाय, 'तिकीट इथं बघू नका, बाहेर जाऊन बघा, असे सांगून आणखी १ हजार रुपयांची मागणी केली. मोहम्मदनं आणखी १ हजार रुपये देऊन एकूण ५ हजार ५०० रुपये त्याला दिले.

मोहम्मद यांनी तिकीटघराबाहेर येऊन तिकीट बघितल्यावर त्यांना समजलं की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते खंडावापर्यंतचे ८०५ रुपयांचे तृतीय श्रेणीचे तिकीट आहे. मोहम्मदनं दलालाकडे जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे तिकीट मागितले. तेव्हा दलालानं ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दिले. ५ हजार ५०० रुपयांमध्ये ५५५ रुपयांचं सामान्य डब्याचं तिकीट दिले. त्यामुळं मोहम्मदला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मोहम्मदने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मोहम्मदसह पोलीस तिकीटघराकडे गेले असता, दलाल संजयकुमार दुबेला पोलिसांनी अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा