Exclusive वृद्धाची गाडीत गळा आवळून हत्या

रघुराम यांच्या न कळत राहुल हा गाडीतून उतरला आणि गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसला. रघुराम यांनी फोन ठेवताच त्याने कंबर पट्याने मागून त्यांचा गळा आवळला.

Exclusive वृद्धाची गाडीत गळा आवळून हत्या
SHARES

मुंबईतल्या एका प्रसिद्ध शिपींग प्रा. लिमिटेड कंपनीच्या अकाउंटंटची गाडीतच गळा आवळून हत्या केल्याच्या घ़टनेने एकच खळबळ उडाली आहे. रघुराम श्रीनिवास एथैल (७३) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.  या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून राहुल यादव नावाच्या चालकाला अटक केली आहे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी मुंबईच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाणे परिसरात अकाउंटंट मिसिंग असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र मृतदेह पालघरच्या वाळीव पोलिस ठाणे परिसरात आढळून आल्याने हत्येचा गुन्हा त्या पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.


कंबरपट्ट्याने गळा आवळला

नवी मुंबईच्या कामोठे परिसरात राहणारे रघुराम हे मागील १२ वर्षापासून दमानी शिपिंग प्रा.लिमिटेड कंपनीत  अकाउंटंट म्हणून काम करत आहेत. रघुराम हे कंपनीचे मालक मिनेश दमानी यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू असल्याने रघुराम यांच्याकडे सर्व पैशांचा व्यवहार सोपवलेला असायचा. १३ मे रोजी मालकाने रघुराम यांना बोरिवलीतील एका कन्सलटन्सीमध्ये १५ लाख रुपये देण्यास सांगितले होते. त्यानुसार दुपारी ३ वा. पैसे घेऊन रघुराम हे आरोपी चालक राहुल यादवसह बोरिलीच्या दिशेने निघाले. राहुल हा या कंपनीत मागील ३ वर्षापासून काम करत होता.

सायंकाळी ५ वा. रघुराम हे बोरिवलीच्या सुधीर फडके जंक्शन येथे गाडी थांबवून  कन्सलटन्टला फोनवर पत्ता विचारत होते. बोलण्यात मग्न असलेल्या रघुराम यांच्या न कळत राहुल हा गाडीतून उतरला आणि गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसला. रघुराम यांनी फोन ठेवताच त्याने कंबरपट्ट्याने मागून त्यांचा गळा आवळला. वृद्ध रघुराम यांचा राहुलच्या ताकदीपुढे निभाव लागला नाही. 


राहुलकडे चौकशी 

रघुराम यांची हत्या करून राहुलने त्याचा मृतदेह पालघरच्या वाळीव पोलिस ठाणे परिसरातील हद्दीत रात्रीच्या वेळेस टाकून तो पुन्हा फोर्टला कंपनीत आला. पैसे पोच झाले की नाही हे विचारण्यासाठी दमानी हे रघुराम यांना वारंवार फोन करत होते. मात्र रघुराम हे फोन उचलत नव्हते. दुसरा दिवस उडाजला तरी रघुराम न आल्यामुळे दमानी यांनी माता रमाबाई पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी सर्वप्रथम त्यांनी राहुलकडे चौकशी केली. राहुलने पोलिसांना आपण रघुराम यांना बोरिवली येथे सोडल्याचे सांगितले.

सीसीटिव्हीत उघडकीस 

गाडी ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावरील सीसीटिव्ही पोलीस तपासत होते. त्याचदरम्यान १४ मे रोजी अचानक राहुलने दमानी यांना फोन करून काम सोडल्याचे कळवले. त्यावेळी पोलिसांचा राहुलवर संशय बळावला. पोलिसांनी बोरिवलीतील सुधीर फडके जंक्शन येथील सीसीटिव्ही तपासले असता त्यात राहुलने गाडीतच रघुराम याची गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे वाळीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत रघुराम यांचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी ही हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली.


पैशाच्या लालसेतून हत्या

हत्या करून राहुल हा त्याच्या मूळ गावी उत्तरप्रदेशला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश भोसले, स्वप्निल शिंदे, निलेश शेवाळे आणि पोलिस शिपाई धनाजी धायगुडे याच्या पथकाने राहुलाला उत्तरप्र देशमधून अटक करत मुंबईला आणले. या गुन्ह्यात अधिक तपासासाठी पोलिसांनी राहुलचा ताबा वाळीव पोलिसांना दिला. राहुल विरोधात वाळीव पोलिस ठाण्यात ३०२,३७९,२०१ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पैशाच्या लालसेपोटी हत्या केल्याची कबुली राहुलने दिली असून सध्या तो वाळीव पोलिस ठाण्याच्या कस्टडीत असल्याची माहिती वाळीव पोलिसांनी दिली.हेही वाचा  -

संगीत दिग्दर्शकाचा मोबाइल ‘टकटक गँग’ने चोरला

वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर जेरबंद
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा