परळमध्ये 83 लाखांच्या जुन्या नोटा जप्त


परळमध्ये 83 लाखांच्या जुन्या नोटा जप्त
SHARES

परळ - भोईवाडा पोलिसांनी केईएम रुग्णालयाच्या मागील भागातून एका कारमधून 83 लाखांच्या जुन्या नोटा शुक्रवारी रात्री जप्त केल्या आहेत. याप्रकरणी भैरूलाल फुलचंद जैन (46) याला पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. केईएम हॉस्पिटलच्या मागे असलेल्या डीन बंगल्यासमोरील फुटपाथवर एक जण लाखो रुपयांच्या जुन्या नोटा बदली करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राजेंद्र कंठे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी शुक्रवारी डॉ. एस. एच. रोडवर सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री पावणे आठच्या सुमारास एक मारुती स्वीफ्ट कार (एमएच - 02 एयु - 6593) या ठिकाणी येऊन थांबली. कारचा संशय येताच पोलिसांनी छापा टाकून कारची झडती सुरू केली. झडतीमध्ये पोलिसांना 500 रुपयांची पन्नास हजारांची 155 बंडलं आणि 38 हजाराचे एक बंडल, तसेच एक हजार रुपयांची 1 लाखांची पाच बंडलं आणि 12 हजारांचे एक बंडल अशा एकूण 83 लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या.

भोईवाडा पोलिसांनी स्वीफ्ट कारसह आरोपी चालक जैन याला चलानातून रद्द झालेल्या जुन्या नोटा अवैधरीत्या बाळगल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. आरोपी जेैन हा गोरेगाव स्टेशन रोडवर असलेल्या बोहरा हाऊस इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याने या नोटा कोणाकडून आणल्या आणि तो या नोटा बदली करण्यासाठी कोणाकडे देणार होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा