सफाई कर्मचारी मुलीची एक चूक; २ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

मृत मुलाच्या वडिलांनी न्याय मिळावा यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सफाई कर्मचारी मुलीची एक चूक; २ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
SHARES

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात २ वर्षांच्या चिमुरड्याचा चुकीचं इंजेक्शन दिल्यानं मृत्यू झाला आहे. ताहा खान असं या लहान मुलाचं नाव आहे. मृत मुलाच्या वडिलांनी न्याय मिळावा यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ताह खान यांची प्रकृती ठीक नसल्याने त्याच्या आई वडिलांनी नूर रुग्णालयमध्ये त्याला दाखल केले होते. दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीला ताह खानला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच ताह खान याचा मृत्यू झाला.

संतापजनक बाब म्हणजे २ वर्षाच्या या चिमुरड्याला नर्सिंग होमधील १६ वर्षांच्या सफाईकाम करणाऱ्या मुलीने इंजेक्शन दिले होते. या निष्काळजीपणामुळे २ वर्षाच्या ताहा खान याला आपले प्राण गमवावे लागले.

ताहा खानच्या वडिलांनी रुग्णालयातील अधिकारी, नर्स आणि सफाई कामगार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ताहा खानला दिलेले इंजेक्शन ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले असता त्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे या लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे तपासाअंती समोर आले आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, परिचारिका सलीम ऊन्नीसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर चारही आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा