लोकलचा प्रवास जिवावर बेतला; एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी


लोकलचा प्रवास जिवावर बेतला; एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी
SHARES

लोकलचा प्रवास गुरूवारी दोन महाविद्यालयीन तरुणींच्या जिवावर बेतला. या दोन्ही अपघातात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला असून दुसऱ्या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. यातील ज्योती वर्मा(17) या तरूणीचा रेल्वे रुळ ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या अपघातात तेजश्री वैद्य ही धावत्या रेल्वेतून पडून जखमी झाली आहे.


दुर्लक्षाची बळी

‘रूळ ओलांडणे धोकादायक आहे’, ‘रूळ केवळ रेल्वेगाड्यांसाठी असतात, माणसांसाठी नव्हे’ अशा प्रकारे जनजागृती नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र रेल्वेच्या या जनजागृतीकडे दुर्लक्ष करून आजही अनेक नागरिक रेल्वे रुळ ओलांडत आपला जीव धोक्यात घालत असतात. याच दुर्लक्षपणाची बळी ज्योती देखील ठरली.



रुळ ओलांडणे पडले महागात

विक्रोळीच्या वर्षानगर, साईनाथ सोसायटी, पार्कसाईट परिसरात राहणारी ज्योती वर्मा विद्या विहारच्या सोमय्या कॉलेजमध्ये कॉमर्स ११ वीत शिकते. गुरूवारी सकाळी विद्याविहार स्टेशनला रेल्वे रुळ ओलांडताना तिचा अपघात झाला. त्यावेळी स्थानिकांनी जखमी ज्योतीला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



दारात उभी तेजश्री चक्कर येऊन पडली

दुसऱ्या घटनेत घाटकोपरमध्ये राहणारी तेजश्री वैद्य ही ठाण्याला जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत होती. ही लोकल दादर माटुंगा स्थानकादरम्यान असताना दरवाजात उभ्या असलेल्या तेजश्रीला भोवळ आली आणि ती धावत्या रेल्वेतून खाली पडली. वेळीच तिला स्थानिकांनी रुग्णालयात नेले. तेजश्रीच्या बॅगेतील ओळखपत्रामुळे पोलिसांना तिची ओळख समजली. तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पोलिसांनी तिला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल केले. तेजश्रीच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर जखमा झाल्या असून ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


रेल्वेच्या जनजागृतीकडे दुर्लक्ष

मुंबईत दिवसाला असे रेल्वे रुळांवर १७ ते १८ अपघात होत असतात. त्यातील दिवसाला अंदाजे ८ ते ९ मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना होतात. हे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला जीव धोक्यात घालत असतात.



हेही वाचा

वाशिंद-आसनगावदरम्यान रुळावर घातपाताचा प्रयत्न


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा