SHARE

मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)चा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलझोल सर्वज्ञात आहे. त्यात आता आणखी एका झोलची भर पडली आहे. एमएसआरडीसी केवळ टोल कंत्राटदारांवरच नव्हे तर फूड मॉलधारकांवरही कशी मेहरबान आहे याचाच उत्तम नमूना समोर आलाय. टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकाराखाली समोर आणलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेवरील खालापूर येथील फुड मॉलचे कंत्राटाची मुदत संपून दोन महिने उलटले तरी हा मॉल सुरूच असल्याचं उघड झालंय. कंत्राट रद्द करत नव्यानं कंत्राट देण्याची वा मॉलची जागा ताब्यात घेण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून अपेक्षित असताना कराराचे नियम धाब्यावर बसवून एमएसआरडीसी आणि कंत्राटदार मलई खात असल्याचंही समोर आलं आहे.

त्याचवेळी एक्स्प्रेस वेवर असलेल्या हॉटेल पूजाच्या हॉटेलधारकाकडे एमएसआरडीसीची विविध शुल्कापोटीची 96 लाखांची थकबाकी आहे. मात्र ही थकबाकी वसूल करण्यासाठी एमएसआरडीसीकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याची धक्कादायक माहितीही उजेडात आली आहे. इतकंच नव्हे तर स्टॉल टाकून फुड मॉलधारकांनी जागोजागी अतिक्रमण केले असून अनेक नियमांचे उल्लघन केले आहे. असे असताना एमएसआरडीसी मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचा आरोप यानिमित्ताने शिरोडकर यांनी केला आहे. तर या प्रकरणी आता सरकारने लक्ष घालावे असे म्हणत फुडमॉलची जागा ताब्यात घेण्याचे, 96 लाखांची थकबाकी वसूल करण्याचे तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या