पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार

सोमवारी आरोपीला कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणलं होतं. त्यावेळी नैसर्गिक विधीच्या नावाखाली आरोपी शौचालयात गेला असताना त्याने शौचालयाच्या खिडकीतून पळ काढला.

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार
SHARES
मानसिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला ४७ वर्षीय आरोपी वर्सोवा पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना नुकतीच कूपर रुग्णालयात घडली. नैसर्गिक विधीसाठी पोलिसांनी त्याला रुग्णालयातील शौचालयात नेले असता त्याने पळ काढल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. 


खिडकीतून पळाला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. आरोपीला डायबेटीज असल्याने पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी प्रथम जे.जे. रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोमवारी त्याची रवानगी अंधेरीतील कोठडीत करायची असल्यामुळे त्यापुर्वी वैद्यकीय अहवाल सादर करणं गरजेचं होतं. त्यामुळे सोमवारी आरोपीला कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणलं होतं. त्यावेळी नैसर्गिक विधीच्या नावाखाली आरोपी शौचालयात गेला असताना त्याने शौचालयाच्या खिडकीतून पळ काढला.


अधिकाऱ्यांचं मौन

गस्तीवरील निष्काळजी शिपाई आणि अधिकाऱ्यामुळे हा आरोपी पळण्यात यशस्वी ठरल्याने मुंबई पोलिस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. याबाबत बोलण्यास पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी टाळलं असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेतली असून लवकरच त्या ड्युटी अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.हेही वाचा  -

कुलाब्यात परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

Exclusive वृद्धाची गाडीत गळा आवळून हत्या
संबंधित विषय