...आणि रॉय म्हणाले 'पुलिस का काम होता है लडना!'


...आणि रॉय म्हणाले 'पुलिस का काम होता है लडना!'
SHARES

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबईसह राज्यात अनेक नामचीन प्रकरणाचा उलगडा त्यांनी केला. आपल्या कामातूनच त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. मात्र, शुक्रवारी रॉय यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला. त्यांच्यासोबतचे काही अनुभव राज्याचे माजी पोलिस महासंचालक पी. एस. पसरिचा यांनी 'मुंबई लाइव्ह'सोबत शेअर केले. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला....


खाकी वर्दीसाठी तळमळ...

मी हिमांशूला तो महाविद्यालयात असल्यापासून ओळखतो. त्यावेळी मी वाहतूक विभागाचा सह आयुक्त होतो. त्यावेळी हिमांशू माझ्याकडे कायम यायचा. तो त्यावेळी त्याच्या डॉक्टर वडिलांसोबत पास्ता लेनमध्ये रहात होता. हिमांशूला त्याच्या वडिलांनी लहानपणी दत्तक घेतले होते. तो एकुलता एक होता. त्यावेळी पोलिसांच्या कार्यक्रमात तो व्हॉलिंटिअर म्हणून उभा रहायचा. खाकी वर्दीबाबत त्याच्या मनात असलेली तळमळ लक्षात घेऊनच मी त्याला आयपीएस होण्याचा मार्ग सुचवला.


आपल्या डोळ्यांदेखत त्याला मी मोठं होताना पाहिलं आहे. मात्र, त्याची अशा प्रकारची एक्झिट ही मनाला चटका लावून जाणारी आहे.


अभ्यासादरम्यान भावनाशी ओळख...

आयपीएसचा अभ्यास सुरू असतानाच त्याची भावनाशी ओळख झाली होती. १९८८ साली हिमांशूची आयपीएस तर भावनाची आएएससाठी निवड झाली. त्यावेळी दोघांनी मला भेट म्हणून एक शर्ट आणि टाय दिला होता. आजही तो दिवस माझ्या लक्षात आहे. त्यानंतर हिमांशूला महाराष्ट्र कॅडर मिळालं, तर भावनाला तामिळनाडूला पाठवलं. दोघांना लग्न करायचं असल्याने भावनाने महाराष्ट्र कॅडर मिळावं यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, तो नाकारण्यात आल्याने कालांतराने तिने राजीनामा देऊन मुंबईत लहान मुलांना मदत करणारी एनजीओ सुरू केली.


पुलिस का काम है लडना...

हिमांशूने आजपर्यंत अनेक मोठमोठी प्रकरणं हाताळली. लैला खान हत्याकांड, आयपील स्पॉट फिक्सिंग, जे. डे. मर्डर केस यासारखी प्रकरणं संपूर्ण पोलिस दलाच्या लक्षात राहणारी आहेत. इतक्या दुर्धर आजारातही तो मोठ्या हिंमतीने लढा देऊन उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. पण मागच्या दीड महिन्यांपासून तो फार थकला होता. माझं पंधरा दिवसांपूर्वी त्याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याच्या आवाजावरून तसं जाणवत असल्याने मी त्याला विचारलं. पण तो फक्त एवढंच म्हणाला..पुलिस का काम होता है लडना!



हेही वाचा

हिमांशू रॉय यांचा कॅन्सर नियंत्रणात होता, मग नक्की झालं काय?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा