अतिरिक्त पोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांचा कॅन्सर पूर्णपणे नियंत्रणात होता, अशी माहिती नाशिकच्या एचसीजी मानवता केअर सेंटरचे कार्यकारी संचालक आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली आहे. डॉ. राज नगरकर हे हिमांशू रॉय यांच्यावर कॅन्सरसंदर्भात उपचार करत होते.
हिमांशू रॉय यांना हाडांचा कर्करोग नसून किडनीचा कर्करोग होता आणि तो हाडांमध्ये पसरला होता, अशी माहिती डॉ. राज नगरकर यांनी दिली आहे. इथल्या सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर या केंद्रामध्ये हिमांशू रॉय यांच्या तपासण्या केल्या जात होत्या. या तपासण्यांच्या आधारे त्यांच्यावर मुंबई आणि पुण्यामध्ये उपचार सुरू होते. हिमांशू यांना २००० सालापासून किडनीचा कर्करोग होता. २०१६ पर्यत त्यांची प्रकृती बरी होती. मात्र मागील दोन वर्षांपासून कर्करोग हाडापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.
त्यांचा ट्रीटमेंटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचा ट्यूमर पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता. तरी, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे सांगणं अवघड आहे. पण, उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे रिपोर्ट्स आले होते, त्यात कॅन्सर नियंत्रणात असल्याचं आढळलं होतं.
डॉ. राज नगरकर, कॅन्सरतज्ज्ञ, एचसीजी मानवता केअर सेंटर
राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या 'आत्महत्येप्रकरणी कुणालाही जबाबदार धरू नये. आजारपणाला कंटाऴूनच आपण हे पाऊल उचलल्याचं' म्हटलं आहे.
चर्चगेट येथील सुरूची या शासकीय इमारतीत रॉय हे त्यांच्या कुटुंबियांसोबत रहात होते. दुपारी १ वाजता जेवणानंतर रॉय यांच्या खोलीत कुणी नसताना सर्व्हिस रिवॉल्व्हरने त्यांनी तोंडात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. रॉय यांच्या खोलीतून गोळी झाडण्यात आल्याच्या आवाजाने कुटुंबियांसह त्यांच्या घरातील नोकरानी त्यांच्या खोलीजवळ धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात बिछान्यावर रॉय हे निपचित पडले होते. त्यावेळी घरातल्यांनी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटल येथे हलवले.
रुग्णालयाच रॉय यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जी.टी. रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणी कफपरेड पोलिस ठाण्यात १७४ सीआरपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा
आजारपणाला कंटाळून हिमांशू राॅय यांनी उचललं टोकाचं पाऊल