सत्तेत आल्यापासून सरकार ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी आग्रह धरत असताना सायबर सुरक्षेच्या आघाडीवर मात्र गृह विभागाची कमालीची अनास्था दिसून येत आहे. शहरातील वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यात मुंबई पोलिस अपयशी ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे रोखण्यासाठी ४ सायबर पोलिस ठाणे उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेला ४ वर्षे पूर्ण झाली. तरी या सायबर पोलिस ठाण्यांची एक वीट देखील अद्याप रचली गेलेली नाही. उलट शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या मात्र तिपटीने वाढलेली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, याकरीता महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ वर्षापूर्वी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ४६ ‘सायबर लॅब’ उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता.
सध्या वांद्रे-कुर्ला संकुलात एकमेव सायबर पोलिस ठाणे कार्यरत आहे. परंतु, नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी तिथंही मनुष्यबळ तोकडंच पडत आहे. या ठाण्यात २० हून अधिक लेखी तक्रारी दररोज येतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेकदा या तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यांकडे पाठवल्या जातात. शिवाय नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत गुन्ह्याच्या उकलीचे प्रमाण जेमतेमच असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
सायबर पोलिस ठाण्यात वाढणाऱ्या गुन्ह्यांमुळे स्थानिक पोलिस ठाण्यात एक सायबर लॅब उघडण्यात आली खरी, मात्र तिथंही सर्व काही अलबेल आहे. अर्धज्ञानी पंडित अधिकाऱ्यांमुळे कित्येक दिवस नागरिकांच्या तक्रारी तशाच पडून राहतात. पाठपुरावा करून तक्रारदारच कालांतराने दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गेलेल्या पैशांवर पाणी सोडतो. विशेष म्हणजे सायबर गुणे उकलीचं प्रमाण नगण्य आहे.
मुंबईतील सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी २ अशी ४ सायबर पोलिस ठाणी उभारण्यात येणार होती. या पोलिस ठाण्यांसाठी मुंबई पोलिसांनी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूकही केली आहे. या पोलिस ठाण्यांसाठी वांद्रे येथे जागाही आरक्षित करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी अद्याप पोलिस ठाणी बांधण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी केलेली सायबर पोलिस ठाण्यांची घोषणा हवेतच असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.
मुंबईत या वर्षात आॅक्टोबर २०१८ पर्यंत ११८३ सायबर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. त्यापैकी फक्त २२६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील वर्षी २०१७ मध्ये १३६१ गुन्ह्यांची नोंद असून फक्त १९७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
गुन्ह्याचं स्वरूप | गुन्ह्याची नोंद | गुन्ह्याची उकल |
---|---|---|
क्रेडिट कार्डद्वारे गुन्ह्यांची फसवणूक
| ४६८
| ९० |
ईमेल आणि एसएमएसद्वारे फसवणूक | २६३ | ९८ |
हॅकिंग आणि इतर गुन्हे | ४९५ | ९४ |
हेही वाचा-
बनावट जन्म दाखला बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अंबरनाथमध्ये चोरांनी अंड्यांनी भरलेला ट्रक पळवला