रुळावर पडलेला खांब..मोटरमनची सतर्कता..आणि पहाटेचा 'तो' अपघात!


रुळावर पडलेला खांब..मोटरमनची सतर्कता..आणि पहाटेचा 'तो' अपघात!
SHARES

सकाळची वेळ. वांद्र्याहून सीएसटीकडे जाणारी लोकल. हार्बर लाईनच्या किंग्ज सर्कल स्टेशनच्या १०/३८ क्रमांकाच्या रुळावरून नेहमीप्रमाणे ही लोकल जात असताना अचानक मोटरमनचं लक्ष रूळावर पडलेल्या लोखंडी खांबाकडे गेलं. वेळीच सतर्क होत मोटरमनने लोकल थांबवली. लागलीच स्थानकातील पोलीस घटनास्थळी आले, आणि त्यांनी हा खांब हटवून लोकल पुढे रवाना केली. रेल्वे पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. मात्र खरा प्रकार काहीतरी वेगळाच होता.

या घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता घडलेली दुसरी घटना..पनवेलच्या गोडाऊनमधून कार मुंबईतल्या शोरुममध्ये घेऊन जाण्यासाठी सीएसटीच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला एनएल ०१ के ७५०२ क्रमांकाचा ट्रक. किंग्ज सर्कल स्थानकाच्या पुलाखालून जात असताना त्याला अपघात झाला. कारण ट्रकची उंची ही पुलाच्या उंचीपेक्षा जास्त होती. उंचीमुळे अडकलेला ट्रक थेट दुभाजकावर चढला. पण या अपघातावेळी आणखी एक गोष्ट घडली. रस्त्यावरच्या दिव्याच्या लोखंडी खांबालाही ट्रकची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात बसली की खांबाच्या वरचा १५ किलो वजनाचा आणि १० फूट लांबीचा वाय आकाराचा भाग कोसळून थेट किंग्ज सर्कल स्थानकाच्या रेल्वे रुळावर जाऊन पडला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा त्यांनी पंचनामाही केला. ट्रकचा चालक सुमन कुमार राजेंद्र प्रसाद याला पोलिसांनी ताब्यातही घेतले. पण रुळावर पडलेला खांबाकडे पोलिसांचं लक्षच गेलं नाही.

किंग्ज सर्कल स्टेशनमधल्या रुळावर पडलेला खांबाचा भाग रेल्वे पोलिसांसाठी संशयाची बाब होती. त्यामुळे वडाळा जीआरपी आणि आरपीएफच्या पथकांनी पुन्हा घटनास्थळी जात या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी या खांबाचा घातपाताशी काहीही संबंध नसून पहाटे घडलेल्या अपघातामुळेच हा खांबाचा भाग रेल्वे रुळावर पडल्याचं निष्पन्न झालं, अशी माहिती वडाळा लोहमार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी दिली. यावेळी आरपीएफचे वरिष्ठ प्रभारी सुधीर शिंदे आणि किंग्ज सर्कल स्टेशन व्यवस्थापक एन. के. सिन्हा उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा