इसीसच्या प्रभावाखाली माहीमच्या अश्रफने सोडलं घर?

  MAHIM
  इसीसच्या प्रभावाखाली माहीमच्या अश्रफने सोडलं घर?
  मुंबई  -  

  मुंबईच्या माहीम परिसरातून दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेला अश्रफ इसिसच्या प्रभावाखाली आल्याचं समोर आलं आहे. अश्रफचा शोध घेण्याचं काम महाराष्ट्र एटीएस आणि गुप्तहेर संघटना करत आहेत. मात्र अश्रफने इसिसच्या प्रभावाखाली येऊन घर सोडल्याचे तपासात समोर आले आहे.

  जुन्या माहिम परिसरात 20 वर्षीय अश्रफ त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. 28 फेब्रुवारीला त्याची बारावीची परीक्षा होती. मात्र 27 तारखेला रात्री तो दुकानात सामान आणायला जातो असं सांगून गेला तो परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत अश्रफ घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्रफ हा जास्तीत जास्त वेळ सायबरमध्ये घालवत असे. या प्रकरणी पोलिसांनी सायबरचा मालक आणि अश्रफचा मित्र शाकिबला ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान अश्रफ हा सायबरमध्ये इसीसचे व्हिडिओ तासनतास बघत असल्याचं समोर आलं. दरम्यान, एटीएस त्याच्या सगळ्या सोशल अकाऊंटची माहिती घेत असून, तो अजून कुणाकुणाच्या संपर्कात होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

  दरम्यान अश्रफच्या काकांनी हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याचे सांगत आमच्या पायाखालची वाळूच सरकल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने काही चुकीचे केले तर आमचा परिवार त्याला कधीही साथ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.