महाराष्ट्र बंद: सोशल मीडियावर अाक्षेपार्ह पोस्ट टाकली? होणार कायदेशीर कारवाई

'महाराष्ट्र बंद' दरम्यान काही समाजकंटकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण पेटवण्याचं काम केलं. अशा अाक्षेपार्ह ५० पोस्टवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं असून या पोस्ट टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र बंद: सोशल मीडियावर अाक्षेपार्ह पोस्ट टाकली? होणार कायदेशीर कारवाई
SHARES

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण पेटवण्याचं काम केलं. अशा अाक्षेपार्ह ५० पोस्टवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं असून या पोस्ट टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


दुपारनंतर वातावरण चिघळलं

भीमा-कोरेगावचे पडसाद मुंबईत उमटल्यानंतर काही आंदोलकांनी कायदा हातात घेत ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड आणि रास्तारोको केलं. पोलिसांच्या निरीक्षणानुसार सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यानंतर ‘समाजभावना भडकवणाऱ्या काही पोस्ट्स, अफवा व्हाॅट्सअॅप, फेसबुकवर सारख्या सोशल मीडियावर पसरण्यास सुरूवात झाल्यानंतर आंदोलकांनी कायदा हातात घेण्यास सुरूवात केली.


अल्पवयीन मुलांचा समावेश

परिस्थिती चिघळत गेल्याने मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश देत, २५ गुन्हे नोंदवून ३७ जणांना अटक केली. तर २५० जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. तर राज्यात एकूण १२० गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालकांनी दिली.



सोशल मीडियावर लक्ष

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या भावना भडकवणाचं काम करणाऱ्यांवर पोलिस नजर ठेवून होते. त्यानुसार सायंकाळी दलित संघटनांनी आंदोलन मागे घेतलं असलं. तरी सोशल मीडियावर त्यावेळी समाजभावना भडकवण्याच्या उद्देशाने अपलोड करण्यात आलेल्या ५० पोस्टवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. या पोस्ट दुसऱ्याला पाठवण्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.


तेव्हा, पोस्ट टाकताना सावधान!

सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. गुन्हेगारी कृत्यासाठी, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वा दुसऱ्याचं नुकसान होईल, असं कृत्य करण्यासाठी काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. अशा घटनांमुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. सोशल मीडिया वापरताना धार्मिक, जातीय भावना दुखावल्या जातील असा मजकूर, छायाचित्र, व्हिडिओ क्लिप, तांत्रिक क्लृप्त्या करून बदल केलेली छायाचित्रे पोस्ट करणं, लाईक करणं, शेअर करणं, कमेंट करणं, फॉरवर्ड करणं, प्रसारित करणं हा देखील दखलपात्र गुन्हा आहे.

त्यामुळे युजर्सनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना. कुणाच्या भावना दुखावतील, समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणं टाळावं तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा-

संभाजी भिडेंची रविवारची सभा रद्द

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा