मुंबईतून शंभरहून अधिक आंदोलनकर्ते ताब्यात


मुंबईतून शंभरहून अधिक आंदोलनकर्ते ताब्यात
SHARES

भीमा-कोरेगावच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. या हिंसेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. आंदोलकांनी दगडफेक केल्याने अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मुंबईतील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान कायदा हातात घेणाऱ्या १०० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


चेंबूरमधून आंदोलनाला सुरूवात

भीमा-कोरेगावच्या विजयदिनावेळी उमटलेल्या हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी सकाळपासूनच मुंबईत पहायला मिळाले. चेंबूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरल्याचा मेसेज सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल झाला. आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली. तर काही आंदोलकांनी रस्त्यावरील बेस्ट बसच्या काचा फोडून या आंदोलनाला हिंसक वळण दिलं. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. त्यानंतर सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले.



कुठे, काय झालं?

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केलं. त्यामुळे २५ मिनिटानंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र संघटीत झालेल्या आंदोलकांनी पुन्हा रेलरोको करून हार्बर सेवा ठप्प पाडली. घाटकोपरच्या अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देत बेस्ट बससह अनेक वाहनांची तोडफोड केली.


धरपकड सुरू

काही क्षणात या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहोचलं. या भागात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याने मुंबईहून पनवेल आणि पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडुप आदी भागातही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये शंभरहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांवर कायदा हातात घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



चेंबूरमध्ये पोलिस जखमी

चेंबूरमध्ये आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत एका पोलिस काॅन्स्टेबल जखमी झाला आहे. दिपक खेडेकर असं या पोलिस काॅन्स्टेबलचे नाव असून ते सध्या चेंबूर पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. आंदोलकांना कायदा हातात घेण्यापासून रोखताना. दगडफेकीत त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून दिपक यांना उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात नेलं आहे.


अफवांवर विश्वास ठेवू नका...

शहरात काही समाजकंटक इंटरनेटच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी वस्तूस्थिती जाणून घ्या. कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

भीमा कोरेगाव हिंसाचार: संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे विरोधात गुन्हा दाखल

Live Update - भीमा-कोरेगाव दगडफेकीचे मुंबईत पडसाद, बेस्ट फोडल्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा