अशा मोटारसायकल विक्रेत्यांपासून सावध रहा!


अशा मोटारसायकल विक्रेत्यांपासून सावध रहा!
SHARES

विकलेल्या दुचाक्यांची वाहतूक परिवहन विभागाकडे नोंदणी न करताच विक्रेत्याने शो रूम बंद करून पळ काढल्याची घटना धारावीतून उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात शुक्रवारी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दुचाकी मालक शाम पोस्टुरे यांनी दाखल केली आहे. हा फसवणुकीचा गुन्हा असल्याने या गुन्ह्याबाबत पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल असे धारावी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

धारावीतल्या एम. जी. रोडवरील महात्मा गांधीनगर येथे राहणाऱ्या शाम पोस्टुरे यांनी 25 मार्च 2016 रोजी धारावीतल्या ए. आर. ऑटोव्हील या दुचाकी विक्रेत्याकडून बजाज व्ही - 15 ही मोटार सायकल हप्त्यावर खरेदी केली होती. दुचाकी खरेदी करण्यासाठी त्याने 30 हजार रुपये रोकड भरून बाकी रक्कम कॅपिटल फर्स्ट नावाच्या बँकेतून लोन केली होती. लोनमुळे त्याला 98 हजार 600 रुपयांत दुचाकी मिळाल्याने 2 हजार 685 रुपयांचा हप्ता आजही त्यांच्या पगारातून कापला जात आहे. 

मोटार सायकल खरेदी करून वर्ष उलटले तरी दुचाकीचे अधिकृत पेपर आपल्याला मिळाले नाहीत. या पेपरसाठी आपण अनेकदा शोरूममध्ये आलो. मात्र शोरूम डीलरने पोस्टाने लवकरच तुमच्या गाडीचे पेपर घरपोच होतील असे सांगत वेळ मारून नेली. मात्र आता त्याने चक्क भाड्याचे शोरूम खाली करून पोबारा केल्याने लाखभर रुपयांची दुचाकी कवडीमोल झाली आहे. दुचाकीच्या नोंदणीची रक्कम भरूनही पेपर हातात नसल्याने वाहतूक नियमांच्या भीतीपोटी दुचाकी घराबाहेर काढणे अवघड होऊन बसले आहे. 

- शाम पोस्टुरे, दुचाकी मालक

या दुचाकी शोरूम डिलरने 50 पेक्षा जास्त ग्राहकांना गंडा घातल्याचे वास्तव समोर आले असून अनेक दुचाकीमालक रोज या शोरूमवर येऊन या डीलरचा मोबाईल नंबर तसेच राहण्याचा पत्ता विचारत असल्याचे शोरूम जवळील काही दुकानदारांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा