काम नाकारल्याने महापालिकेच्या कंत्राटी महिला कामगाराची आत्महत्या


काम नाकारल्याने महापालिकेच्या कंत्राटी महिला कामगाराची आत्महत्या
SHARES

मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागतील कंत्राटी महिला कामगाराने गुरूवारी फाशी लावून आत्महत्या केली. या आत्महत्येने महापालिका क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण या महिलेने आत्महत्या केली नसून ही पालिका अधिकाऱ्यांनी केलेली हत्या असल्याचा आरोप करत महापालिका कचरा वाहतूक श्रमिक संघाने या महिलेचा मृतदेह चक्क पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून ठिय्या आंदोलन केलं. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं.


न्यायालयाचं संरक्षण असूनही

आत्महत्या करणाऱ्या कंत्राटी महिला कामगाराचं नाव सुमती देवेंद्र (२८) असं असून ही महिला के पश्चिम विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होती. कंत्राटी कामगारांना न्यायालयाचे संरक्षण असतानाही मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडून कंत्राटी कामगारांना काम नाकारण्यात आलं होते.



किती वेतन मिळायला हवं?

नियमानुसार अशा कामगारांना १५ ते २२ हजारांपर्यंत वेतन मिळायला हवं. पण प्रत्यक्षात मात्र या महिलेला ६ ते ८ हजार रुपये इतकंच वेतन मिळत होतं. त्यामुळे ही महिला आर्थिक संकटात अडकली होती. तुटपुंज्या पगारात घर चालवणे शक्य होत नव्हते. या त्रासाला कंटाळूनच या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप करत कचरा वाहतूक संघाने केला आहे.


गुन्हा दाखल करण्याची मागणी

तर, आयुक्तांकडे पत्र लिहित संघाने ज्या अधिकाऱ्यामुळे या महिलेला आत्महत्या करावी लागली आहे. त्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली आहे. तर या महिलेच्या वारसाला महापालिकेत नोकरीसह नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी केल्याचं संघाचे मिलिंद रानडे यांनी सांगितलं आहे.


कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न असून पालिकेकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत संघाने यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचंही संघाकडून जाहीर करण्यात आलं. दरम्यान आत्महत्या करण्यात आलेल्या महिलेच्या वेतनापोटीची एक लाखाची थकबाकी पालिकेकडे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा