नक्षलवादी कनेक्शन: नवलखा, तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा

सध्या जामिनावर असलेले गौतम नवलखा यांनी पुणे पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

नक्षलवादी कनेक्शन: नवलखा, तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा
SHARES

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप असलेले मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांच्यावर २१ नोव्हेंबरपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे पुणे पोलिसांना आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांनाही दिलासा दिला.


गुन्हा रद्द करण्याची मागणी

सध्या जामिनावर असलेले गौतम नवलखा यांनी पुणे पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने नवलखा यांच्यावर १ नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश दिले होते.


अटकेपासून संरक्षण

ही मुदत गुरुवारी संपणार असल्याने या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने नवलखा यांच्यासोबतच आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांनाही २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण दिलं आहे.


पोलिसांची कारवाई

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, व्हर्नन गोन्साल्वीस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी देशातील विविध ठिकाणांहून अटक केली होती.


जामिनावर सुटका

ही कारवाई बेकायदा असल्याचा दावा करत यापैकी काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात या कारवाईविरोधात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने नवलखा यांची जामिनावर सुटका केली होती.

तर उर्वरीत चौघाजणांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या चौघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे.



हेही वाचा-

नक्षलवादी कनेक्शन: फरेरा आणि गोन्साल्वीस यांना अटक

नक्षलवाद कनेक्शन प्रकरणी 'ते' पाच जण महिनाभर नजरकैदेत



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा