मुंबईत उन्हाचा पारा वाढल्याने जोतो गाडीत एसी लावून प्रवास करत आहे. त्यातच मेट्रो आणि मोनोसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदल्याने वाहतूक कोंडी ही मुंबईकरांची मोठी समस्या बनली आहे. याच संधीचा फायदा घेत सिग्नलवर किंवा वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या गाडीच्या काचेवर टक-टक करून गाडीत बसलेल्या व्यक्तीचं लक्ष केंद्रीत करून क्षणार्धात गाडीतील मौल्यवान वस्तू किंवा पैसे चोरल्या जात आहेत. त्यामुळे सावधान.
उपनगरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नुकतीच बोरिवली पोलिसांनी या टोळीच्या एका म्होरक्याला अटक केली आहे.
बोरिवली परिसरात राहणारे किरण मवाना हे गुरुवारी सकाळी बोरिवलीच्या आरएमभट रोडवरील सिग्नलवर थांबले होते. त्यावेळी एकाने किरण यांच्या गाडीच्या काचेवर टक टक करत त्यांचे लक्ष विचलीत करून घेतले. तर दुसऱ्याने किरण यांच्या गाडीतील पाच लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला. वेळीच किरण यांनी त्या चोरट्यांचा डाव ओळखत त्यांना हटकले. मात्र तोपर्यंत ते चोर रिक्षात बसून पळू लागले.
क्षणाचाही विलंब न करता किरण यांनी दुसऱ्या रिक्षातून त्या चोरांचा पाठलाग केला. वेळ न दवडता किरण यांनी पोलिसांची मदत घेण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन लावला. त्यावेळी त्या परिसरात गस्तीवर असलेले सहाय्यक फौजदार मासेकर आणि पोलिस हवालदार देविदास रसाळ यांची मदत किरण यांना मिळाली. काही अंतरावर पोलिसांनी रिक्षा अडवून त्या दोन्ही आरोपींना पकडले. मात्र झटापटीत एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर अटक आरोपीवर बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.