सुरक्षा रक्षकानंच केली घरात चोरी!

 Mulund
सुरक्षा रक्षकानंच केली घरात चोरी!

जर तुम्ही तुमच्या सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर घर सोडून बाहेरगावी जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार मुंबईतील मुलुंडमध्ये घडला आहे. मुलुंड पूर्वेकडील शिल्पी सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाने एका बंद फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली आहे. 14 जून रोजी ही चोरी झाली होती. या चोरट्याने दागिने आणि रोख रक्कम असे मिळून तब्बल 9 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज लंपास करून मुंबईतून थेट उत्तर प्रदेशला पळ काढला होता.


दिवसाढवळ्या चोरी करणारे सुरक्षा रक्षक

दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे मोठी दहशत निर्माण झाली होती. यानंतर कोणताही भक्कम पुरावा नसताना दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर नवघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरट्यांचा पाठपुरावा करत उत्तर प्रदेशला पळ काढला आणि त्यानंतर जे समोर आले ते अगदी चक्रावून टाकणारे होते.

गौरीशंकर चौरसिया आणि राजा अनिलसिंग हे दोघे अशाच प्रकारे खोट्या नावाने एखाद्या इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यानंतर घरांवर पाळत ठेऊन नंतर संधी मिळताच घरफोडी करून तिथून पळ काढायचे. मुंबईत विविध ठिकाणी त्यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत.


चोरी केलेलं सोनं सोनारालाच विकलं

या चोरट्यांकडून 30 तोळे सोने, मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. ज्या सोनाराला त्यांनी सोने विकले होते, त्या दोन सोनारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोणतीही खातरजमा न करता सुरक्षा रक्षक म्हणून त्यांना कामावर रुजू करणाऱ्या रवींद्रनाथ सिंग यांच्या सेक्युरिटी एजन्सीवरदेखील पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे, अशी माहिती नवघर पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

'नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू किंवा दागदागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. कोणतीही खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून नेमू नका' असे आवाहन पोलिस सहाय्यक आयुक्त अनिल वालझडे यांनी केले आहे.हेही वाचा

दहिसरमध्ये दोन तासात 7 घरांवर दरोडा!

ज्येष्ठ नागरिकांनो, असे तुमच्यासोबतही घडू शकते


Loading Comments