'वन अबव्ह', 'मोजोस बिस्ट्रो' आणि 'पी22'वर दुसरा गुन्हा


'वन अबव्ह', 'मोजोस बिस्ट्रो' आणि 'पी22'वर दुसरा गुन्हा
SHARES

लोअर परळच्या कमला मिल कंपाऊडमधील वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पबमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामांबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर शनिवारी पालिकेकडून शहरातील विविध ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पालिकेने वन अबव्ह, मोजोस बिस्ट्रो आणि पी २२ वर ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी दुसरा गुन्हा नोंदवला.



यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कमला मिलमधील अग्नितांडव भडकल्यानंतर शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांकडे पालिकेचं लक्ष वेधलं गेलं. मग शनिवारी सकाळपासूनच कमला मिलमधील स्कायव्ह्यू कॅफे, फ्लिप एमटीव्ही कॅफे, स्माॅशसह वरळीतील रघुवंशी मिल कंपाऊडमधील पनाया आणि शिया स्काय लाऊजने उभारलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई केली. कमला मिल कंपाऊडमधील आग लागलेल्या वन अबव्हमध्ये ३० मीटर रुंद आणि पाच मीटर उंच अनधिकृत बाधकाम करण्यात आलं होतं. याशिवाय तेथील दोन रुममध्ये १३ बाय ३ च्या शीट अनधिकृतपणे बसवण्यात आल्याचं महापालिकेने तक्रारीत म्हटलं आहे. तर मोजोसमध्ये १३ बाय १५ मीटर आणि पाच बाय १० मीटरचं बांधकाम अनधिकृत असल्याचं पालिकेच्या पाहणीत निष्पन्न झाल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या तक्रारीवरून मोजोसच्या युग पाठक, ड्युक तुली तसेच वन अबव्हच्या अभिजीत मानकर आणि संघवी बंधु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यातील पाठक हा एका निवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय कमला मिलच्या रमेश गोवानी यांच्याविरोधातही या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन गुन्हे दाखल होणार आहेत.



आरोपी फरार

कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीनंतर वन अबव्हचे मालक संघवी बंधू यांचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं स्थापन केली असून, यातील एका पथकाने संघवी बंधूंच्या माझगाव येथील घरी अटक करण्यासाठी गेले होते. मात्र दोन्ही आरोपी न सापडल्याने पोलिसांनी घरातील सदस्यांचा जबाब नोंदवल्याचे समजते. वन अबव्हचे हृतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर हे पुण्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एक पथक पुण्याला पाठवण्यात आलं आहे. या तिघांविरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली असून आरोपींचा शोध सुरू असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा