अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच

Mumbai
अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच
अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच
अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच
अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच
अंडरवर्ल्डमध्ये छोटा, टकल्या आणि मचमच
See all
मुंबई  -  

मुंबई... देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आणि नामवंत उद्योजकांचे आश्रयस्थान. तर चंदेरी सिनेसृष्टीतल्या कलाकारांची कर्मभूमी. पण मुंबईची हीच कर्मभूमी एकेकाळी अंडरवर्ल्डच्या खतरनाक डॉननी गाजवली आहे. दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला, छोटा राजन, वरदराजन, अरुण गवळी अशा अनेक माफियांची मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर हुकुमत होती. मुंबईच्या आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रावर या माफियांनी अधिराज्य गाजवलं आहे. अंडरवर्ल्ड माफियांचा इतिहास बहुतांश मुंबईकरांना माहीत असावा. पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत नसेल आणि ती म्हणजे अंडरवर्ल्ड माफियांच्या टोपण नावांसंदर्भात. हे माफिया जेवढे भयानक होते तेवढी त्यांची टोपण नावं मजेशीर होती किंवा आहेत. विचित्र नावामुळे त्यांची नावं कायम लक्षात रहातात. अर्थात या प्रत्येक नावामागे काही ना काही कारण आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना अशी नावं पडतात आणि हीच नावं त्यांची ओळख बनते.

'मुच्छड'
दाऊद इब्राहिम कासकर. गुन्हेगारी जगतातील बेताज बादशाह. मुंबईतल्या डोंगरी परिसरात दाऊद आपलं बालपण जगला आहे. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते. पोलीस खात्यात आदराचे स्थान असलेल्या कासकर यांच्या घरातच दाऊदचा जन्म झाला. घरच्या परिस्थितीमुळे दहा वर्षांचा असताना दाऊदला शाळा सोडावी लागली. १४व्या वर्षी दाऊदनं पहिला गुन्हा केला. पहिल्यांदा रस्त्यावरील एका व्यक्तीच्या हातातून पैसे चौरून तो पसार झाला. १५ वर्षांचा व्हायच्या आतच त्यानं किरकोळ चोऱ्या, गळ्यातील दागिने चोरणे, मारामारी, खिशातील पाकिटे चोरायला सुरुवात केली होती. हळूहळू दाऊदनं स्वत:ची टोळी सुरू केली. त्यानंतर करीम लालासोबत मिळून तो छोटे मोठे गुन्हे करू लागला. पण नंतरच्या काळात दाऊदनं त्याचा भाऊ सब्बीरसोबत तस्करीचं काम सुरू केलं आणि त्यानंतर तो करीम लाला गँगचा शत्रू झाला. १९७५ मध्ये दाऊदने हाजी मस्तानसोबत हातमिळवणी केली. हळूहळू तो हाजी मस्तानचा खास माणूस झाला आणि इथूनच दाऊदचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास सुरू झाला. असा कोणता गुन्हा नव्हता जो दाऊदनं केला नव्हता. आता तो गुन्हेगारी जगतातील बेताज बादशाह झाला होता.

अंडरवर्ल्डमध्ये सर्वांच्या वर असलेला दाऊद इब्राहिम आणखी एका नावनं ओळखला जायचा आणि ते म्हणजे 'मुच्छड’. दाऊदला सुरुवातीपासून मिशी आहे. त्यामुळे काही जण त्याला 'मुच्छड' या नावानं हाक मारायचे. अर्थात त्याला या नावानं संबोधण्याचा अधिकार सर्वांना नव्हता. त्याची खास मंडळीच त्याला 'मुच्छड' या नावानं हाक मारतात.

'छोटा' राजन
छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे. मुंबईच्या चेंबूर उपनगरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात छोटा राजनचा जन्म झाला. चेंबूरमधील शंकर थिएटरजवळ तो तिकिटांचा काळा बाजार करायचा. त्याचे वडील सदाशिव ठाण्यातील हेस्ट कंपनीत कामगार होते. पाचवीत असताना छोटा राजननं शाळा सोडली. त्यानंतर वाईट संगतीत तो गुन्हेगारी विश्वाकडे खेचला गेला. १९७८ नंतर पोलिसांनी सिनेमा तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली होती. त्यावेळी पोलिसांच्या एका गटानं शंकर थिएटरजवळ लाठीमार केला. या वेळी छोटा राजननं पोलिसांच्या हातातील काटी हिसकावून घेतली आणि पोलिसांवरच हल्ला केला. यात पाच पोलीस जखमी झाले. त्यामुळे छोटा राजन चर्चेत आला.

पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सर्व टोळ्यांना त्याला आपल्या गँगमध्ये सहभागी करून घ्यायचे होते. पण छोटा राजन दाऊदच्या गँगमध्ये सामील झाला. त्याच्या अॅक्शनमुळे तो दाऊदच्या पसंतीस उतरू लागला. बडा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन दाऊदचा खास झाला. दाऊदच्या गँगमध्ये आधीपासून 'बडा राजन' होता. त्यामुळे राजेंद्र सदाशिव निकाळजे याला 'छोटा राजन' असे नाव देण्यात आले. पण काही वर्षांनंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला आणि त्यांच्यात गँगवॉर सुरू झालं. छोटा राजनला अटक करण्यात आली आहे. 

'छोटा' शकील
१९९४ मध्ये छोटा राजन गँगमधून बाहेर पडला. त्यामुळे छोटा शकील दाऊदच्या अधिक जवळचा झाला. दाऊदचा अगदी खास माणूस झाला. 'डी' कंपनीचा सीईओ अशी त्याची ओळख झाली. त्याच्यावर १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप आहे. असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत.

शकीलचे मूळ नाव शकील बाबूमियां शेख आहे. दाऊदच्या कंपनीत सामील झाल्यावर 'छोटा शकील' हे नाव त्याला दिले गेले. गँगमध्ये शकील नावाचा एक गँगस्टर होता. ज्याची उंची जास्त होती. त्याला 'लंबू शकील' या नावानं गँगमध्ये ओळख मिळाली. जेव्हा शकील गँगमध्ये सामील झाला तेव्हा दाऊदनं त्याला 'छोटा शकील' हे नाव दिलं. शकीलची उंची कमी होती. त्यामुळे दाऊदनं त्याला 'छोटा शकील' म्हणायला सुरुवात केली.

फहिम 'मचमच'

शेख फहीम अहमद दाऊदच्या गँगमध्ये वसूलीचं काम सांभाळायचा. ९०च्या दशकात दाऊदच वसूलीचं काम सांभाळायचा. पण १९९३ नंतर हे काम छोटा शकील पाहू लागला. पण पोलिसांची नजर नेहमी छोटा शकीलवर असायची. त्याचे फोनकॉल रेकॉर्ड होऊ लागले होते. त्यामुळे छोटा शकीलनं ही जबाबदारी फहीमकडे दिली. देशाच्या बाहेर असूनही फहीम वसूलीचं काम त्याच्या नेटवर्किंगद्वारे करतो.

मुंबईतील प्रॉपर्टी रिडेव्हलपर असलेल्या फहीमचे नाव २००३ मध्ये प्रकाशझोतात आले. २००३ मध्ये फहीमने एका बिल्डरकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला तो समजवून सांगायचा. पण तरी समोरची व्यक्ती पैसे देण्यास तयार नाही झाली तर मग त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. हप्ते वसूल करणारा फहीम प्रचंड बडबडा होता. त्यामुळे तो 'मचमच' या नावानं ओळखला जायचा.

ताहिर 'टकल्या'
दाऊदसाठी काम करणारा ताहिर मर्चेंटला युएईमध्ये अटक केली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. १९९३ बॉम्बब्लास्टमध्ये दाऊदसोबत ताहिरचाही सहभाग होता. 

'ताहिर टकल्या' या नावनं त्याला ओळखले जायचे. कारण ताहिरला टक्कल होते. त्यामुळे सर्व जण त्याला 'ताहिर टकल्या' नावानं बोलवत.

सलीम 'फ्रूट'

मोहम्मद सलीम उर्फ मोहम्मद इकबाल याला 'सलीम फ्रूट' नावानं ओळखले जायचे. 

सलीमचे वडील मुंबईत फळांचा व्यापार करत होते. त्यामुळे दाऊदनं त्याला 'सलीम फ्रूट' हे नाव दिले.

'डॅडी'
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव कामधंद्यासाठी मुंबईत आले होते. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्यानं अरूण गवळीला पाचवीतच शाळा सोडावी लागली. यानंतर वडिलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. पण अरूण गवळीचे वडील गुलाबराव यांना स्थानिक गुंडांनी खूप त्रास दिला. यात पोलिसांनी त्यांची मदत केली नसल्याचंही बोललं जातं. त्यामुळे 1980 च्या दरम्यान गवळी राम नाईक गँगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.

दाऊद दुबईला पळून गेल्यानंतर गवळीला मुंबईत साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. बिल्डर आणि व्यवसायिक आपल्या प्रतिस्पर्धींना संपवण्यासाठी गवळीची मदत घेऊ लागले. गवळीचे साम्राज्य वाढू लागले. १९८० च्या दशकात अरूण गवळीनं दाऊदविरोधात स्वत:ची गँग सुरू केली. मुंबईतील दगळीचाळीत गवळीचे एकहाती वर्चस्व होते. इथूनच तो स्वत:ची गँग चालवायचा. या नव्या गँगमध्ये त्याला 'डॅडी' म्हणून बोलवायचे. कारण गँगमधल्या प्रत्येकाची तो वडिलांसारखी काळजी घेत असे. तसंच हे नाव गवळीला खूप आवडायचं देखील. त्यामुळे त्याला 'डॅडी' याच नावानं संबोधलं जातं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.