गुन्हेगार सापडणार एका क्लिकवर, ॲम्ब‍िस प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी ‘अॅम्बिस’ प्रणाली विकसित केली गेली आहे.

गुन्हेगार सापडणार एका क्लिकवर, ॲम्ब‍िस प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
SHARES

मुंबईतील सराईत आरोपींची इत्यंभूत  माहिती ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीमुळे एका क्लिकवर मुंबई पोलिसांना मिळणं सोपं जाणार आहे. सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ आदी एकत्रित डेटाबेसची माहिती ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीद्वारे जतन केली जाणार आहे. या प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मुंबई पोलिस आयुक्तालयात करण्यात आले. गुन्हेगारांची माहिती तत्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अॅम्बिस प्रणाली महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


   

अशी आहे ॲम्ब‍िस प्रणाली

जुन्या व पारंपरिक पद्धतींनी होणाऱ्या कामकाजाची परिभाषा बदलून राज्य पोलिस दलाने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी ‘अॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि  हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसंच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.

  • जगातील सर्वोत्तम अशी अॅम्बिस प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
  •  डोळ्यांचे, हाताच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास मदत
  •  ४१ युनिटमधील ११६० पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा
  •  २६०० पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण
  •  एका क्लिकवर मिळणार आरोपींची सर्व माहिती
  •  फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर
  • सी.सी.टी.एन.एस. आणि सीसीटीव्हीशी कनेक्टेड
  •   नवीन सिस्टीमनुसार डिजिटल स्वरूपात साठवले जुने साडेसहा लाख बोटांचे ठसे
  •  १४३५  चान्सप्रिंट्स प्रणालीमध्ये उपलब्ध
  •  पहिल्याच दिवशी शोधल्या ८५ गुन्ह्यांशी संबंधीत ११८ चान्सप्रिंट्स


सायबर विभागाकडं जबाबदारी

 'ॲम्बिस' प्रणालीची अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे.  आयडेमिया या कंपनीने ही प्रणाली विकसित केली असून गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. प्राईस वॉटर हाऊस कूपर्स या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.


रक्षक हैं हम 

यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे.एस. भरुचा सभागृहाचे उद्‌घाटन, कचरा मुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृह निर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह उपस्थित होते.



हेही वाचा -

दाऊदचा पुतण्या रिझवानसह तिघांना मोक्का

मुंबईत दिवसाला हरवतात ५ मुली, पोलिसांना नाही गुन्ह्याचं गांभीर्य




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा