जेव्हा क्लार्कच न्यायाधीश बनतो तेव्हा...


जेव्हा क्लार्कच न्यायाधीश बनतो तेव्हा...
SHARES

मुंबई - कोर्टातील लिपिकाने 105 केस पेपरवर न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए पोलिसांनी मारुती साळुंखे (49) नावाच्या लिपिकाला अटक केली आहे.

विशेष म्हणजे या सगळ्या चेक बाउंसच्या केसेस एकाच कंपनीच्या म्हणजेच "इंडिया इन्फोलाईन लिमिटेड" कंपनीच्या असल्याने या लिपिकाने पैश्याच्या मोबदल्यात या फाईल्सवर न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. बेलार्डपियरच्या न्यायालय क्रमांक 33 च्या न्यायाधीशांना तेव्हा झटका बसला जेव्हा पेंडिंग केस पेपर तपासताना त्यांना तब्बल 105 केस पेपरवर त्यांनी न केलेल्या स्वतःच्याच स्वाक्षऱ्या दिसल्या, चौकशी केली असता यामागे लिपिक मारुती साळुंखे असल्याचं समोर आलं.

"बेलार्ड पियर कोर्टाचे रजिस्ट्रार दिनेश हेगडे यांनी दिलेल्या तक्रारींवर आम्ही न्यायिक लिपिक मारुती साळुंखे यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली असून गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांना 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली" असल्याची माहिती झोन 1 चे डीसीपी मनोज शर्मा यांनी दिली. कोर्टात केसेसची पेंडन्सी वाढल्याने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या केल्याची कबुली साळुंखे यांनी पोलिसांना दिली असली तरी या 105 केसेस या एकाच कंपनीच्या असल्याने आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात साळुंखेने हा घाट घातल्याचा पोलिसांना संशय आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा