कुलाब्यातील 'त्या' महिलेची हत्या जवळच्या व्यक्तीकडून?


SHARE

कुलाबा येथे झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी अद्याप पोलिसांनी कुणालाही पकडले नसले तरी ही हत्या ओळखीच्याच व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आहे. हत्येच्या वेळी श्वेता घरात एकटीच असणे अपेक्षित होते, असं असतानाही घरात जबरदस्ती घुसल्याची कोणतीही खूण नसल्याचं पोलिसांनी संगितलं. एवढंच नव्हे तर सुरुवातीला उशीने तोंड दाबून त्यानंतर तिचा मृतदेह मोरीत नेऊन त्यानंतर गळा कापल्याचा संशय घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांना आहे. गळ्यावरील जखमा बघता या जखमा या फोर्क (चमचा) च्या असल्याचा संशय वर्तवला जात आहे. रक्त लागलेला एक फोर्क देखील यावेळी फोरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.

कुलाब्याच्या सुंदर नगरमध्ये श्वेता आपल्या नवऱ्यासोबत राहत असे. बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे तिचा नवरा महेंद्र आणि दीर हे कामावर गेले होते. 11 च्या सुमारास त्यांच्या घरातील हितेश नावाचा मुलगा देखील कामावर गेला. त्यानंतर काय झाले हे कुणालाच समजले नाही.

दुपारी घरातील एसी चालू असून देखील श्वेता हाकेला उत्तर का देत नाही हे बघण्यासाठी खाली राहणारी एक महिला गेली असता तिला मोरीत श्वेता पडलेला आढळली. तिच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. तिला तात्काळ सेंटजॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या श्वेताने 15 दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती. त्यात घरातून काहीही चोरीला न गेल्याने हत्येचं कारण स्पष्ट होत नाही. दरम्यान या प्रकरणी तपास योग्य दिशेने जात असून, आम्ही लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचू असा दावा कुलाबा पोलिसांनी केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या