पालकांचा जीव टांगणीला, अन् 'त्या' ५ जणी करत होत्या 'मुंबई दर्शन'

शाळेतून सुटल्यावर मुली घरी न आल्यामुळं चिंताग्रस्त पालकांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर रात्रभर आपल्या मुली कशा असतील या भीतीने पालकांचा जीव टांगणीला लागला होता. या पालकांचा जराही विचार न करता या मुलींनी अवघ्या २४ तासांतच मुंबई दर्शन केलं.

पालकांचा जीव टांगणीला, अन् 'त्या' ५ जणी करत होत्या 'मुंबई दर्शन'
SHARES

कुलाबा परिसरातून शुक्रवारपासून बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनी अखेर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांच्या हाती लागल्या. या सर्व विद्यार्थिनींना कुलाबा पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे या मुलींचे पालक त्यांना शोधण्यासाठी जीवाचं रान करत असताना या सर्व मुली 'मुंबई दर्शन' करत होत्या.


नेमकं प्रकरण काय?

या पाचही मुली फोर्ट कॉन्व्हेट स्कूल, कुलाबा या शाळेत शिकतात. शुक्रवारी 'ओपन डे'च्या निमित्ताने या मुलींचे पालक शाळेत आले होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या चाचणी परीक्षेत या सर्व मुलींना कमी गुण मिळाले होते. हा निकाल मुलींच्या पालकांना दाखवण्यात आल्याने त्या तणावाखाली गेल्या. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासून या मुली बेपत्ता असल्यानं त्यांच्या पालकांनी कुलाबा पोलिसात तक्रार दाखल केली. या विद्यार्थिनीना कमी गुण मिळाल्यानं या मुली बेपत्ता झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत होता.


कशा सापडल्या या पाचजणी?

शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या पाचही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर हँगिंग गार्डनला गेल्या, तिथून मरीन ड्राइव्हला जाऊन बसल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं होत. तिथून या मुलींनी टॅक्सीने ठाणे आणि ठाण्यापासून पुन्हा कुर्ला असा प्रवास केल्याचं उघड झालं. मधल्या काळात रात्रभर त्यांनी मुंबई दर्शन केलं. तर शनिवारी दुपारी कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.


२४ तासांचा प्रवास

शाळेतून सुटल्यावर मुली घरी न आल्यामुळं चिंताग्रस्त पालकांनी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर रात्रभर आपल्या मुली कशा असतील या भीतीने पालकांचा जीव टांगणीला लागला होता. या पालकांचा जराही विचार न करता या मुलींनी अवघ्या २४ तासांतच मुंबई दर्शन केलं.

मुंबईतल्या पोलिस पथकानं सर्व पोलिस ठाण्यात या मुलींचे फोटो व्हायरल केले होते. तसंच या मुली सापडल्यास कुलाबा पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं. या मुलींची फोटो व्हायरल झाल्यानं कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.



हेही वाचा-

मुंबईतील ५ विद्यार्थिनी शुक्रवारपासून बेपत्ता

फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; साडेचार लाख उकळले



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा