SHARE

कुलाबा येथील श्वेता तांडेल या महिलेच्या हत्येप्रकरणी कुलाबा पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव हितेश पांडे असे असून पांडे तिच्या दिराचा मित्र आहे. श्वेता जेथे रहात होती, त्याच इमारतीतील तळमजल्यावर तो रहात होता.

कुलाब्यातील सुंदर नगर येथे श्वेता तांडेल (28) नावाची महिला तिचा नवरा महेंद्रबरोबर रहात होती. तिचा दिर चेतन हा त्याच इमारतीत तळ मजल्यावर हितेश पांडे याच्यासोबत रहात होता. हितेश हा तांडेल कुटुंबाचा मित्र झाल्यामुळे त्याचे महेंद्रच्या घरी दररोज येणे-जाणे होते. बुधवार 11 मे रोजी महेंद्र आणि चेतन नेहेमीप्रमाणे सकाळी फॅशन स्ट्रीट येथे कामावर गेल्यानंतर हितेश श्वेताच्या घरी नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिला घरात एकटी पाहून हितेशने श्वेताशी लगट करण्याचा प्रयत्न केला. श्वेताने त्याला विरोध केला आणि मदतीसाठी आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली.

श्वेताच्या ओरड्यामुळे आपण पकडले जाऊ, या भितीने घाबरलेल्या हितेशने स्वयंपाकघरातील काटाचमच्याने तिचा गळा कापला. श्वेता गतप्राण झाल्याची खात्री झाल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून बंद करून तो स्वत:च्या खोलीत गेला. तेथे त्याने आंघोळ केली आणि काही घडलेच नाही, असे भासवत तोही कामावर निघून गेला.

पोलीस तपासादरम्यान हितेशने दिशाभूल करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर त्याचा खोटेपणा उघडकीस आल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय जाधव यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या