आर्थर रोड कारागृहात १७० हून अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या प्रमाणात कारागृहात कोरोनाचा फैलाव झाल्याने आता कैद्यांच्या उपचारासाठी कारागृहातच कोरोना वॉर्ड सुरू केला जाणार आहे. कारागृहात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बराक क्रमांक ३ मध्ये कोरोना वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर येऊन कैद्यांची नियमित तपासणी करतील.
आर्थर रोड कारागृहात २८०० कैदी आहेत. कोरोनाचा फैलाव वाढल्याने राज्यातील बहुतांश कारागृह लॉकडाउन करण्यात आली. भाजीपाला तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही आतबाहेर करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र अशा परिस्थितीत एका स्वयंपाक्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर कोरोनाचा फैलाव संपूर्ण कारागृहात झाला. हत्येच्या एका गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं. त्यानंतर ४५० कैद्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १७० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
बहुतांश कैद्यांमध्ये प्राथमिक लक्षणे असली तरी या सर्वांना चेंबूर येथील माहुलमध्ये विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याची कुणकुण लागताच स्थानिकांनी त्यास विरोध केला. अखेर कारागृह प्रशासनाने या कैद्यांची व्यवस्था कारागृहात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -