बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देणारी टोळी गजाआड


बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देणारी टोळी गजाआड
SHARES

मुंबईत वाहनांच्या चोरीबरोबरच बनावट वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) देणाऱ्या टोळक्यांची कमी नाही. अशाच एका टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ताहीर हुसैन सरदार हुसैन शेख आणि सायना सैद खान या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहे. न्यायालयाने या दोघानांही २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


मोठी फसवणूक

अवघ्या १० हजार रुपयांत ही टोळी बनावट लायसन्स देत असल्याचं तपासात पुढे आलं आहे. या आरोपींनी ५०० ते ६०० चालकांना अशा बनावट लायसन्सची विक्री केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितलं. आरोपींंकडून पोलिसांनी २० हून अधिक बनावट लायसन्स, एक संगणक, सीपीयू, स्कॅनर मशिन, प्रिंटर आणि इतर दस्तावेज हस्तगत केले आहेत.


'असं' घेतलं ताब्यात

मुंबई शहरात बनावट लायसन्स बनविणारी एक टोळी कार्यरत असून ही टोळी हुबेहुबे लायसन्स बनवून त्याची गरजूंना १० हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या टोळीतील २ म्होरके खार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आशा कोरके, सुधीर जाधव, विजय अंबावडे, विकास सावंत, पेडणेकर आदी पथकाने यांनी खार परिसरात साध्या वेषात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळी तिथे बनावट लायसन्स विक्रीसाठी आलेल्या ताहीर खान आणि सायना खान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं.


तपास सुरू

चौकशीत ते दोघेही ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील रहिवाशी असून ताहीर हा त्याच्या घरातच बोगस लायसन्स तयार करुन सायना हिला देत होता. त्यानंतर सायना गरजूंना एक परवाना १० हजार रुपयांना विकत होती. या दोघांनी आतापर्यंत ५०० ते ६०० बोगस परवान्यांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या गुन्ह्यांत अन्य काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा-

करचुकवेगिरीप्रकरणी महालक्ष्मी रेसकोर्सवरील १८ सट्टेबाजांना अटक

केदारनाथ सिनेमात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा