'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाड


'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाड
SHARES

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं अाहे. जुबेर सय्यद (३०), हसन शेख (४०), फईम शेख (३०), अबू बोकर (४५), मुकेश शर्मा (४५) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी या टोळीकडून ५१ स्वाईप मशिन, दोन लॅपटाॅप, ६५ बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कार्ड बनवण्यासाठी लागणारे कार्ड रिडर आणि शेकडो चेकबूक हस्तगत केले आहेत. फसवणूक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका आणि चीनच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.


२०१३ पासून फसवणूक

मालाडच्या मालवणीत परिसरात राहणारा एक दुकानदार कार्डक्लोन करून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेलचे पोलिस निरीक्षक रहिमतूल्ला सय्यद यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधिकारी संतोष गायकर, स.पो.नि लक्ष्मीकांत साळुंखे, दिप बने, नागेश पुराणिक सुनिल माने आणि इतर कर्मचाऱ्यांनी मालवणीतील कपड्याचे व्यापारी हसन शेखला संशयित म्हणून ताब्यात घेतले. हसन शेखच्या चौकशीतून या टोळीचा पोलिस माग काढत होते. २०१३ पासून ही टोळी परदेशी नागरिकांना गंडवत आहे.

या टोळीने आतापर्यंत गोवा, बंगळूर, जयपूर, हिमाचल, लुधियाना, चंदीगड, कुलु मनाली येथे अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात अद्याप एकही तक्रारदार पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनीच मालवणी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात ४२०, ४६७,४६८,४७१,३४१२० (ब) भादवि सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क),६६ (ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे.


असा चोरला जायचा डाटा

मुंबईतील नागरिकांचे कार्ड क्लोन करून त्यांना लुबाडल्यास पोलिस पकडतील या भितीने या टोळीने परदेशी नागरिकांना टार्गेट केले. देशातील पर्यटन स्थळांना भेट देणारे परदेशी नागरिक खरेदीसाठी ज्या दुकानात जातात तेथे ते पैसे देण्यासाठी कार्डचा वापर करतात. त्यामुळे दुकानदारांना हाताशी धरून त्यांना या चोरीत २० टक्के कमिशन दिलं जायचं. त्यानंतर दुकानदारांचे स्वाइप मशिन रात्री घरी आणून परदेशी नागरिकांच्या कार्डमधून चोरलेल्या माहितीतून बनावट कार्ड बनवून पैसे काढले जायचे.

 विशेष म्हणजे तक्रारदाराला जरी संशय आला तरी पैसे खात्यावर जमा होईपर्यंत त्याला काही करता येऊ नये यासाठी ठराविक वेळेतच हे कार्ड स्वाइप करून पैसे काढले जायचे. उदा. परदेशात बँका बंद झाल्यानंतर ही टोळी भारतातून त्यांच्या खात्यातून पैसे काढायची. त्यामुळे परदेशी नागरिक बँकेत तक्रार करण्यास जाईपर्यंत काही तास उलटायचे. तोपर्यंत चोरांच्या खात्यावर पैस जमा झालेले असायचे. मात्र, या चोरट्यांना परदेशी नागरिकांचा डाटा आणि पीन कोड कसा मिळायचा याचा पोलिस शोध घेत आहेत.


अनेकांच्या सहभागाची शक्यता

या टोळीतील मुख्य आरोपी जुबेर सय्यद (३०) हा मूळचा बंगळुरूचा रहिवाशी असून तो सध्या मिरारोड परिसरात राहतो. २०१३ मध्ये त्याने मालवणीतील हसन शेख (४०) या दुकान मालकाला हाताशी धरत या चोरीस सुरूवात केली होती. या टोळीतील अबू बोकर हा बदलापूरला राहणारा आरोपी मुंबईतून सर्व कार्डच्या मशिन रात्री आणून द्यायचा. तर फईम शोरा हा अंधेरीतील एक दुकानदार असून तो कमिशनवर मशिन देत असल्याने त्यालाही अटक केली आहे. या गुन्ह्यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

खारमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या?

विनयभंग करणारा सीआरपीएफ जवान निलंबित



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा