सायबर चोरट्यांनी लोकलच्या मोटरमनला दहा लाखाला गंडवलं

अचानक नाईक यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. त्यात एक लिंक दिली होती. तसेच सहा लाख ट्रान्सफर करण्याबाबतचा मजकूरही दिला होता. तो मेसेज वाचत नाही तोच नाईक यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मुलीचा फोन आला.

सायबर चोरट्यांनी लोकलच्या मोटरमनला दहा लाखाला गंडवलं
SHARES
मुंबईच्या लोकलमधील मोटरमनच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल दहा लाख रुपये लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहे. 


इंटरनेट सुविधा कमकुवत

 मूळचे कोकणातील वेंगुर्लाचे असलेले तक्रारदार राजेश नाईक हे तीन वर्षापासून रेल्वेत मोटरमन म्हणून कामाला आहेत. एप्रिल महिन्यात नाईक यांना कन्यारत्न झाले. पत्नी गावी असल्यामुळेे नाईक ६ एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावी गेले. याच दरम्यान त्यांनी गावी घर बांधायचे असल्यामुळे त्यांनी वडिलांच्या खात्यावर ६ लाख रुपये आॅनलाईन पाठवले होते. मात्र गावी इंटरनेट सुविधा कमकुवत असल्याने काही कारणास्तव ते पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. मात्र पत्नी रुग्णालयात असल्याने नाईक यांनीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मुलगी झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.


अनोळखी मुलीचा फोन 

१४ एप्रिल रोजी अचानक नाईक यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. त्यात एक लिंक दिली होती. तसेच सहा लाख ट्रान्सफर करण्याबाबतचा मजकूरही दिला होता. तो मेसेज वाचत नाही तोच नाईक यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मुलीचा फोन आला. त्यावेळी तिने आपण आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याच बँकेत नाईक यांचे खाते होते. फोनवरील महिलेने 'तुमचे काही कारणास्तव पैसे ट्रान्सफर होऊ शकले नाहीत, मात्र तुम्ही मला अकाऊंट डिटेल्स दिल्यास मी त्वरीत खात्यावर पैसे ट्रान्सफर करीन असे तिने सांगितले.' नाईक याचा विश्वास पटावा यासाठी तिने अकाऊंट नंबरचे पहिले चार आकडेही सांगितले.


खाते रिकामे

नाईक याचा विश्वास पटल्याने त्यांनी तिला बँकेच्या खात्यासंबंधीत असलेली सर्व माहिती दिली. त्यानंतर नाईक गावी असल्याने यांचा फोन आऊट आॅफ रेंज होता. त्यामुळे त्यांनीही फोनकडे फारसे लक्ष दिले नाही. याच दरम्यान त्यांच्या खात्यातून टप्याटप्याने चोरट्यांनी तब्बल दहा लाख रुपये लंपास केले. १० मे रोजी नाईक हे गावावरून सपत्नीक परतल्यानंतर घर खर्चासाठी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. त्यावेळी 'खात्यावर एक रुपयाही नाही आणि पैसे काय काढताय' असे सांगितल्यानंतर नाईक यांच्या पायाखालची जमिनच सरकली. बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे कळाले. या प्रकरणी नाईक हे शुक्रवारी तक्रार नोंदवण्यासाठी अंधेरी पोलिस ठाण्यात आले होते. या प्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत असून बँकेसंदर्भातील गोपनिय माहिती कुणालाही न सांगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



माझी आजवरची सर्व जमापुंजी चोरट्यांनी चोरली. पदरात आता लहान मुलीची जबाबदारी आहे. पत्नी आणि मुलीच्या औषधोपचाराचा खर्च, घरखर्च, वयोवृद्ध वडिलांचा खर्च कसा भागवायचा या विचारानेच त्रस्त झालो आहे.
- राजेश नाईक


हेही वाचा  -

बोगस पत्रकार आणि पोलिसाला पायधुनी पोलिसांनी केली अटक

धावत्या लोकलमध्ये चढणं पडलं महागात, दैव बलवत्तर म्हणून वृद्ध थोडक्यात बचावला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा