टिळकनगर आग प्रकरणातील फरार विकासक अटकेत

टिळकनगर परिसरातील सरगम सोसायटीच्या ३५ व्या क्रमांकाच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर २७ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती.

टिळकनगर आग प्रकरणातील फरार विकासक अटकेत
SHARES
टिळकनगर येथील सरगम इमारत आग प्रकरणात पोलिसांनी बिल्डर सुभक जमनादास मापारा (५६) याला अटक केली. तब्बल एक वर्ष मापारा पोलिसांना चकवा देत गुजरातमध्ये लपून बसला होता. या प्रकरणी टिळक नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिळकनगर परिसरातील सरगम सोसायटीच्या ३५ व्या क्रमांकाच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर २७ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती.  या आगीत सुनीता जोशी ( ७२), भालचंद्र जोशी ( ७२), सुमन श्रीनिवास जोशी ( ८३), सरला गांगर (५२) आणि लक्ष्मीबेन गांगर (८३) यांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. तर आगीबरोबरच धुराचे लोट पसरल्याने दोन जण जखमी झाले. ही इमारत तळमजला अधिक पंधरा मजल्यांची आहे.

रात्रीच्या वेळ असल्याने अनेक रहिवासी घरातच होते. आग लागताच अनेकांनी जीव मुठीत घेऊन घरातून पळ काढला. मात्र ज्येष्ठांना आणि महिलांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेकजण या आगीत अडकले. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ बचाव कार्य सुरू करत इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकत गेली. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत होत्या. 

या आग प्रकरणी या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी टीळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत विकासकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी या आग प्रकरणी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांच्याविरुद्ध  भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तक्रार दाखल होताच सुुभक गुजरातला फरार झाला. तब्बल एका वर्षानंतर पोलिसांनी त्याला गुजरातच्या वलसाड येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनिल काळे करत आहेत.



हेही वाचा -  




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा