प्राणांची आहुती देत कुत्र्याने वाचवला मालकिणीचा जीव


प्राणांची आहुती देत कुत्र्याने वाचवला मालकिणीचा जीव
SHARES

कुत्र्याच्या इमानदारीच्या अनेक चर्चा आपण आजवर ऐकल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला आहे. मात्र सायन परिसरात एका कुत्र्याने त्याच्या मालकिणीचा जीव वाचवताना स्वत:चाच जीव गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणात मालकिणीला वाचवताना या कुत्र्याने आपला जीव गमावला आहे. याप्रकरणी सायन कोळीवाड्यात राहणाऱ्या व्यंकटेश चेल्लप्पा देवेंद्रन(20) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पाळीव प्राण्याची हत्या कलम 429 अन्वये कारवाई करुन त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.

नक्की झालं काय?

सायन कोळीवाड्यातील मक्कावाडी परिसरात राहणारा व्यंकटेश चेल्लप्पा देवेंद्रन याचे शेजारी रहात असलेल्या ज्योती नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. ज्योतीची मोठी बहीण रोझीचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यावरून या दोन कुटुंबात नेहमीच खटके उडत होते. रविवारी 9 एप्रिल 2017 रोजी रात्रीच्या वेळेत या दोन कुटुंबात कडाक्याचे भांडण झाले. रोजच्या भांडणाला वैतागलेला वेंकटेश रागात हातात चाकू घेऊन रोझीच्या अंगावर धावून आला. घाबरलेली रोझी स्वतःचा बचाव करण्यासाठी गल्लीतून ओरडत धावत शेजारी राहणाऱ्या सुमती नावाच्या महिलेच्या घरात घुसली. 

दरम्यान, तिचा पाठलाग करीत व्यंकटेश सुमतीच्या घराजवळ येऊन धडकला आणि रोझीला शिवीगाळ करीत तिला जीवे मारण्याची धमकी देत घरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी सुमती आणि व्यंकटेशमध्ये झटापट सुरु झाली. ही झटापट सुमतीचा पाळीव कुत्रा लकीने पाहिली. आपल्या मालकिणीवर होत असलेला हल्ला पाहून संतापलेला लकी भुंकत व्यंकटेशच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला. 

कुत्रा चावताच संतापलेल्या व्यंकटेशने काहीही मागे पुढे न पाहता हातातील चाकूचा जोरदार प्रहार लकीच्या पोटावर केला. चाकूचा प्रहार होताच लकी रक्ताच्या थारोळ्यात पडला. ते पाहून व्यंकटेशने घटनास्थळावरून पोबारा केला. मालकीण सुमतीने लकीला तात्काळ परळच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात हलविले. परंतु दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा