सर्पमित्राकडून हिसकावून घेत सापाची हत्या; मद्यपी तरूणाची क्रुरता


सर्पमित्राकडून हिसकावून घेत सापाची हत्या; मद्यपी तरूणाची क्रुरता
SHARES

मुंबईत एखाद्या ठिकाणी साप आढळल्याचा काॅल आल्याबरोबर मुंबईतले सर्पमित्र लगेच त्या ठिकाणी धाव घेत सापाला वाचवण्यासाठी पोहचतात. आपल्या जिवाची बाजी लावत सापाला वाचवतात आणि नियमाप्रमाणं वनविभागाच्या हवाली करतात. अशाच एका सापाला जीवदान देऊन सापाला वनविभागाच्या हवाली करण्यासाठी निघालेल्या सर्पमित्रांना एका क्रुर अऩुभव आला.


सापाला ठेचून झाडावर लटकवलं

एका मद्यधुंद तरूण या सर्पमित्रांसमोर आला. सर्पमित्रांना धमकावत त्याने हा साप जबरदस्तीनं हिसकावून घेतला. एवढ्यावरच हा मद्यधुंद तरूण थांबला नाही. तर त्यापुढं जात त्याने आपल्या क्रुरतेचा उच्चांक गाठला. या सापाला काठीनं ठेचून मारलं आणि झाडावर लटकवलं. अंगावर शहारा आणणारी ही घटना असून या तरूणाविरोधात कडक कारवाईची मागणी आता सर्पमित्रांकडून होत आहे.


सर्पमित्रांना धमकावत साप घेतला

शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मानव अभ्यास संघाच्या सर्पमित्रांना साप आढळल्याचा फोन आला. त्यानुसार सर्पमित्र ओंकार बाबर आपल्या एका सहकाऱ्याबरोबर घटनास्थळी, गोरेगाव आरे काॅलनी इथं पोहचले. ज्या व्यक्तीनं काॅल केला होता त्या व्यक्तीनं हा साप पकडून गोणीत बांधून ठेवला होता. त्यानुसार सर्पमित्रांना हा साप त्या व्यक्तीच्या ताब्यातून घेऊन वनविभागाकडे सुपर्द करणं इतकंच काम शिल्लक होतं. त्यानुसार हे सर्पमित्र अडीच्या सुमारास आरे काॅलनीतून गोणीत भरलेला साप वनविभागाकडे देण्याची प्रक्रिया करण्यासाठी निघाले असता एक मद्यधुंद तरूणांना सर्पमित्रांना
धमकावत साप हिसकावून घेतला.

वनविभागाकडे तक्रार

नशेत असलेल्या या तरूणानं सापाला काठी आणि दगडानं ठेचून मारत चक्क झाडावर लटकवत आपली क्रुरता दाखवली. आपण सापाला जीवदान देण्यासाठी आलो पण सापाला वाचवू शकलो नाही याची हळहळ या सर्पमित्रांना असून आता या तरूणाविरोधात कडक कारवाईची मागणी सर्पमित्रांनी केली आहे. त्यानुसार वनविभागाकडे रितसर तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती सर्पमित्र अतुल कांबळे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. या तक्रारीनुसार वनविभाग तपास घेत आहे. पण अद्याप या तरूणाला अटक झालेली नाही. त्यामुळं या तरूणाला त्वरीत अटक करण्याचीही सर्पमित्रांची मागणी आहे.



हेही वाचा-

बेपत्ता एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याची हत्या

महिलांच्या डब्यात घुसून तरूणाचे अश्लिल चाळे, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा