पंजाब नॅशनल बँके (PNB)ला सुमारे १३ हजार कोटी रुपयांना ठकवून भारताबाहेर पळ काढलेला आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याची परदेशातील खाती गोठवण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. स्वित्झर्लंड येथील बँकांमध्ये मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदी यांची ४ खाती होती. या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा होते. या चारही खात्यातील रक्कम गोठवण्यात आली आहे.
भारताच्या मागणीनंतर नीरव मोदीची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहीती स्विस बँकेने एका निवेदनाद्वारे दिली आहे. तपास यंत्रणांकडून मोदीला मिळालेला हा दुसरा दणका आहे. अटक झाल्यापासून मोदी सध्या लंडनमधील वॅण्ड्सवर्थ तुरुंगात आहे. प्रत्यार्पणासंबंधी सुनावणी घेणाऱ्या वेस्ट मिनस्टर न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मोदीने ३ वेळा जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
Four Swiss bank accounts of fugitive Nirav Modi and his sister Purvi Modi have been seized. Swiss authorities have seized these accounts on request of Enforcement Directorate (file pic) pic.twitter.com/mxz5TVDtJ0
— ANI (@ANI) June 27, 2019
मोदीचं प्रत्यार्पण केल्यास त्याला भारतातील कुठल्या तुरुंगात ठेवणार याचा तपशील १४ दिवसांत देण्यास न्यायालयाने सांगितलं होतं. त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेत मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील कोठडीची माहिती दिली होती.
याआधी याच घोटाळ्यातील आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करत असल्याची माहिती अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दिली होती. चोक्सी सध्या अँटिग्वात लपून बसला आहे. या कारवाईमुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे.
पीएनबी घोटाळ्याची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू असून मोदी तसंच चोक्सीची ४ हजार ७६५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा-
मेहुल चोक्सीची नागरिकता होणार रद्द, अँटिग्वा सरकारची घोषणा
तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!