तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!

मल्ल्यासह नीरवच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्यास त्याला कुठल्या तुरूंगात ठेवण्यात येईल, तिथं काय सुविधा असतील? याची माहिती लंडन न्यायालयाने मागवली होती.

तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!
SHARES

पंजाब नॅशनल बँके (PNB)ला १३ हजार कोटी रुपयांना फसवणूक भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला भारतात आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहे. लंडनच्या न्यायालयाने त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिल्यास नीरवला आर्थर रोड तुरूंगातील हाय सिक्युरिटी असलेल्या बराक नं १२ मध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली. याच बराकीत विजय मल्ल्याला ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. तसं झाल्यास मल्ल्या आणि मोदी एकमेकांचे शेजारी होतील.

नीरवला १९ मार्च रोजी लंडनच्या स्काॅटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला लंडनमधील वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयापुढे हजर केलं असता, न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला. सध्या नीरवला ‘हर मॅजेस्टीज प्रिझन वाँर्डवर्थ’ या गर्दीच्या तुरूंगात ठेवलं आहे.

प्रत्यार्पणाचे जोरदार प्रयत्न

नीरवसोबतच बँकांना साडेनऊ हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांना फसवून लंडनमध्ये पळून गेलेला तथाकथित मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी गृह मंत्रालयाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मल्ल्यासह नीरवच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिल्यास त्याला कुठल्या तुरूंगात ठेवण्यात येईल, तिथं काय सुविधा असतील? याची माहिती लंडन न्यायालयाने मागवली होती. 

बराक क्र. १२ 

त्यानुसार गृह विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवून ही माहिती देण्यास सांगितलं होतं. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मल्ल्यासह नीरवचं प्रत्यार्पण झाल्यास त्याला आर्थर रोड तुरूंगातील बराक क्र. १२ मधील २ पैकी एका खोलीत ठेवण्यात येईल. यापैकी एका खोलीत आधीच ३ कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. तर दुसरी खोली रिकामी आहे.  

हवेशीर खोली

पत्रात माहिती देण्यात आली आहे की, या खोलीचा आकार २५ बाय १५ फूट एवढा असून इतर खोल्यांच्या तुलनेत या खोलीचा आकार मोठा आहे. या खोलीत ३ पंखे ६ ट्युबलाईट असून खाेलीला २ खिडक्याही आहेत. त्यानुसार ही खोली प्रकाशमान आणि हवेशीर आहे. कैद्याला आपलं खासगी सामान ठेवण्यासाठी खोलीत स्टोरेजची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

मोदी आणि मल्ल्या दोघांचही प्रत्यार्पण झाल्यास दोघांना ३ हून अधिक कैदी असलेल्या खोलीत ठेवलं जाणार नाही. मोदीला या बराकीत ठेवण्यात आलं तर त्याच्या खासगी वापरासाठी ३ चौ. मीटरची जागा मिळेल. ही जागा युरोपीय नियमानुसार आहे. त्याला एक सुती पायपुसणी, उशी, चादर आणि ब्लँकेट देखील मिळेल. 

मिळतील सर्व सुविधा

त्याला व्यायामासाठी तसंच मनोरंजनासाठी ठरावीक वेळेत बाहेर येण्याची परवानगी मिळेल. त्याला स्वच्छ पाणी, वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधा मिळेल. या बराकीत नियमीत सुनावणीसाठी व्हिडिओ काॅन्फरसिंगची देखील सुविधा आहे. 

ही बराक अत्यंत सुरक्षित असल्याने तसंच बराकीबाहेर प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असल्याने त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं आश्वासनही जेल प्रशासनाने दिलं आहे.  

 


हेही वाचा-

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, पीएनबी घोटाळ्याप्रकरणी बेड्या

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनची मंजुरीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा