ठाणे कारागृहातून ८० पदवीधर उतीर्ण

गांधी विचारांवर दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला कारागृहातील ९२ कैदी बसले होते. हे सर्व बंदी पास झाले असून या परीक्षेत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा १०० टक्के निकाल लागला आहे.

ठाणे कारागृहातून ८० पदवीधर उतीर्ण
SHARES

माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते, असे म्हटलं जाते. त्यामुळेच कारागृहातील कैद्यांमध्ये अमूलाग्र बदल घडवण्याच्या  हेतूने अभिनव उपक्रम राबवले जातात. कैद्यांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून लोकउपयोगी वस्तू बनवून घेतल्या जातात. तर शिक्षणाची आवड असलेल्या कैद्यांना पून्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कारागृह प्रशासनाने यशवंतराव मुक्त विद्यापीठच्या मार्फत पदवीधर शिक्षण सुरू केले. ठाणे कारागृहातून २००३ पासून आतापर्यंत ८० कैदी पदवीधर झाले आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून २००३ सालापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींसाठी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. दरवर्षी परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या कमी जास्त होत असते. बंदींसाठी प्रवेशाची फी आकारली जात नाही. त्यांचे आॅफलाईन फॉर्म्स भरले जातात. ज्या कारागृहात केंद्र असते त्याच कारागृहात परीक्षा घेतल्या जातात. ठाणे मध्यवर्ती कारागृह हे त्यापैकी एक आहे. परीक्षेच्या काळात देखरेखीसाठी विद्यापीठाचे पर्यवेक्षक, कारागृहातील गुरूजी असतात. २०१८-१९ मध्ये १६ कैद्यांनी कला शाखेतून उतीर्ण झाले आहेत. तर २०१९-२० मध्ये ९ कैदी उतीर्ण झाले आहेत.

हेही वाचाः -रेल्वे परिसरात पंतगबाजीला कराल, तर होईल कारवाई

सध्या बंदींना कला आणि वाणिज्य शाखेतून परीक्षा देण्याची सोय आहे. कला शाखेकडे बंदींचा जास्त कल असल्याने या विभागातून परीक्षेला बसणाऱ्या बंदींची संख्या अधिक आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे असे बंदी परीक्षेला बसून वर्षभर अभ्यास करतात आणि त्यांना काही शंका असल्यास कारागृहातील गुरूजींना विचारतात. भविष्यात एम.ए, एम.कॉम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा असलेले बंदी या परीक्षाही देऊ शकतील. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. जर हे बंदी आतमध्ये राहून शिकले तर कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना नोकरी मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच, ते शिकल्यास चांगले व सुशिक्षीत नागरिकही बनतील, असा विश्वासही कारागृह प्रशासनाचा आहे.

हेही वाचाः-मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना, भाजपची भूमिका काय?- राऊत

गांधी विचारांच्या परीक्षेत बंदी पास

यंदा गांधी सर्वोदय मंडळाकडून गांधी विचारांवर दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला कारागृहातील ९२ कैदी बसले होते. हे  सर्व बंदी पास झाले असून या परीक्षेत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा १०० टक्के निकाल लागला आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा