MMRDAसाठी दिले बनावट अनुभव प्रमाणपत्र; अभियंते-कंत्राटदार अडचणीत


MMRDAसाठी दिले बनावट अनुभव प्रमाणपत्र; अभियंते-कंत्राटदार अडचणीत
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) साठी काम केल्याचा अऩुभव असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रताप एमएमआरडीएतील दोन अभियंत्यांना चांगलाच महागात पडला. ज्या कंत्राटदार कंपनीला हे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले त्या कंत्राटदार कंपनीलाही आता हे प्रकरण चांगलंच भोवणार आहे. या प्रकरणी कंत्राटदारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर या चौकशीनंतर अभियंत्यांसह कंपनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एन.ए. कन्स्ट्रक्शन या कंपनीला एमएमआरडीएतील अतिरिक्त मुख्य अभियंता ए. के. पहल आणि कार्यकारी अभियंता पी. के. वेणी यांनी बोगस अनुभव प्रमाणपत्र दिले होते. एमएमआरडीए या सरकारी यंत्रणेसाठी काम केल्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करत या कंत्राटदार कंपनीने हरियाणातील प्रकल्पाचे कंत्राट मिळवले होते. त्यानुसार हरियाणातील कंपनीने यासंबंधी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता एन. ए. कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झाले. त्यात हे दोघे अभियंता दोषी आढळल्याने त्यांना बुधवारी 17 मे रोजी निलंबित करण्यात आले. तर एमएमआरडीएकडून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.


हेही वाचा - 

बोगस अनुभवाचे सर्टिफिकेट दिल्याप्रकरणी 'एमएमआरडीए'चे दोन अभियंते निलंबित


अभियंत्यांइतकीच कंत्राटदार कंपनीही दोषी असून, अभियंत्यांप्रमाणेच या कंपनीनेही एमएमआरडीएची फसवणूक केली असल्याने या कंपनीविरोधातही कारवाई करावी अशी मागणी होत होती. त्यानुसार आता कंपनीविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे मदान यांनी स्पष्ट केले आहे. तर अभियंते आणि कंपनीविरोधात गुन्हेही दाखल होणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण अभियंत्यांसह कंपनीलाही महागात पडणार असून, यातून या कारवाईमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वासही एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा