वडाळ्यात मित्रानेच केली मित्राची हत्या

 wadala
वडाळ्यात मित्रानेच केली मित्राची हत्या

वडाळा - प्रेम संबंधातून एका मित्रानेच मित्राचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री वडाळा संक्रमण शिबिरातील म्हाडा चाळीत घडली. अनिल आयोध्याप्रसाद मिश्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी राजू तुळशीराम चौहान (22) याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून रोजगारासाठी आलेले अनिल मिश्रा आणि राजू चौहान मुंबईतल्या वडाळा संक्रमण शिबिरातील म्हाडा चाळीत भाड्याने एकत्र रहात होते. ते एका साउंड डेकोरेटरकडे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मध्यंतरी दोघे एकत्र गावी गेले. दरम्यान राजू चौहानच्या बहिणीवर अनिलची नजर पडली असता तो तिच्या प्रेमात पडला. राजूच्या बहिणीने प्रेमाला होकार दिला. मुंबईला निघण्यापूर्वी अनिलने एक मोबाइल राजुच्या बहिणीला घेऊन दिला. आठ दिवसाच्या मुक्कामानंतर दोघे मित्र मुंबईकडे रवाना झाले. तेव्हापासून अनिल राजूच्या बहिणीशी संपर्क ठेऊन होता.

दरम्यान 13 जानेवारीला रात्री 11. 30 वा. अनिल राजूच्या बहिणीशी मोबाइलवरून संभाषण करत असताना राजूने त्याला पकडले. तेव्हा दोघांत बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या राजूने रागाच्या भरात भाजी कापण्याचा सुरा घेऊन अनिलच्या गळ्यावर वार केला. गळ्याची नस कापली गेल्याने अनिल बेशुद्ध झाला. अनिलला त्याच्या भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले. त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेव्हापासून त्याची स्थिती चिंताजनक होती. मात्र 14 जानेवारीच्या संध्याकाळी त्याचं निधन झालं. घटनेची माहिती मिळताच राजूला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. याप्रकरणी राजू चौहानवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं वडाळा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी सांगितले.

Loading Comments