Exclusive : - डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोलिसाचा मृत्यू, चार वर्षानंतर गुन्हा दाखल


Exclusive : - डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पोलिसाचा मृत्यू, चार वर्षानंतर गुन्हा दाखल
SHARES

मुंबई पोलिस दलातील एका पोलिस शिपायाचा डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायकबाब तब्बल चार वर्षानंतर समोर आली आहे. पोलिस शिपाई गोरक्ष नरसाळे असे या मृत पोलिस  शिपायाचे नाव आहे.  या प्रकरणी पोलिसांच्या नागपाडा रुग्णालयातील दोन डाॅक्टरांवर मृत पोलिसाच्या वडिलांनी गुन्हा नोंदवला आहे. २०१७ मध्ये थंडी व तापामुळे गोरक्षचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. पण तत्पूर्वी त्याच्यावर नागपाडा पोलिस रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गोरक्षच्या कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

हेही वाचाः- राज्यात शुक्रवारी २१,६१० कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण पूर्ण

मूळचे अहमदनगर  पारनेर येथील शिवापुर नरसाळवाडी येथील राहणारे गोरक्ष नरसाळे मुंबई पोलिस दलातील ताडदेवच्या एल विभाग २ मध्ये कार्यरत होते. १ सप्टेंबर, २०१७ ला गोरक्षला थंडी-ताप असल्यामुळे तो नागपाडा येथील जनरल वॉर्डमध्ये भरती झाला होता. ३ सप्टेंबरला अचानक त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेडिकल रेकॉर्डशिवाय त्याला तेथे भरती करण्यात आल्याच्या १० मिनीटातच त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी  गोरक्षचे वडील दत्ताराम गेनऊभाऊ नरसाळे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. औषधांबाबत हलगर्जीपणा झाल्याची कुटुंबियांची तक्रार होती. त्याचे वडिल गोरक्षचे वडिल दत्ताराम गेणुभाऊ नरसाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नागपाडा पोलिसांनी गुरूवारी नागपाडा रुग्णालयातील २ डाॅक्टरांविरोधात भादंवि कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचाः- धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराचा आरोप मागे

 याप्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत असून तपासासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. गोरक्ष हा खूप उत्साही तरूण होता. देशासाठी, कुटुंबियांसाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीने तो पोलिस दलात भरती झाला होता. खडतर प्रवास करून शेतक-याचा मुलगा पोलिस झाला होता. पण त्या दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्वच मित्र खूप दुःखी झालो होतो, असे गोरक्षच्या एका मित्राने सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा