वडाळ्यात हफ्तेखोर टोळीचा सूत्रधार जेरबंद

  wadala
  वडाळ्यात हफ्तेखोर टोळीचा सूत्रधार जेरबंद
  मुंबई  -  

  वडाळा - वडाळ्यातील म्हाडा चाळ तसेच कोकरी आगार परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हफ्तेखोर टोळीला पकडण्यात वडाळा टीटी पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणी पोलीस अभिलेखावरील टोळीचा सूत्रधार सूर्या देवेंद्रन याला पोलिसांनी अटक केली. तर सूर्याला अटक केल्याचे समजताच टोळीतील दोन महिला आणि त्याच्या तीन साथीदारांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात बुधवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरु असल्याचे वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे यांनी सांगितले.

  वडाळा पूर्व येथील म्हाडा चाळ आणि कोकरी आगार परिसरात फिरून धंदा करणारे फेरीवाले, पानवाले, चहाच्या टपऱ्या चालविणारे दुकानदार, पदपथावरील भाजी विक्रेते या टोळीच्या दहशतीमुळे धास्तावले होते. धंदा असो वा नसो ठरल्याप्रमाणे या टोळीतील गुंड रोज खंडणी गोळा करण्यासाठी विभागात फिरकत होते. त्यांच्या दहशतीला घाबरून कित्येक फेरीवाल्यांनी आपला धंदा बंद केला तर काही फेरीवाले आणि दुकानदार निमूटपणे त्यांना खंडणी देत होते. परिणामी रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या मोहम्मद अनिसूर रहिमान युनूस अली नावाच्या पान टपरीवाल्याने मंगळवारी या गुंडांना हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या हफ्तेखोरांनी पान टपरीवाल्यासह त्याच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. त्या हल्ल्यात पान टपरीवाल्याचे कुटुंबीय जबर जखमी झाल्याचे पाहून खंडणीखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे, संतोष नरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहताच अंधाराचा फायदा घेत हफ्तेखोर पसार झाले. मात्र टोळीचा सूत्रधार सूर्या देवेंद्रनला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. आणि त्याची कसून चौकशी केली असता हफ्त्यासाठी मारहाण केल्याचे त्याने कबूल केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.