गुटखाविक्री करणाऱ्या ८१ दुकानांचं शटर डाऊन

गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठीही अन्न आणि औषध प्रशासन प्रशासन (एफडीए) जोरदार प्रयत्न करत आहे. तरीही १०० टक्के गुटखाबंदी लागू करण्यास सरकारला अपशय येत असल्याचं नुकत्याच झालेल्या कारवाईतून समोर आलं आहे.

गुटखाविक्री करणाऱ्या ८१ दुकानांचं शटर डाऊन
SHARES

राज्यात कुठंही गुटखा, सुगंधित सुपारी-तंबाखूचं उत्पादन होत नसताना शेजारच्या राज्यातून हे पदार्थ छुप्या पद्धतीने आणून त्यांची विक्री सुरू आहे. या छुप्या विक्रीला आणि गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठीही अन्न आणि औषध प्रशासन प्रशासन (एफडीए) जोरदार प्रयत्न करत आहे. तरीही १०० टक्के गुटखाबंदी लागू करण्यास सरकारला अपशय येत असल्याचं नुकत्याच झालेल्या कारवाईतून समोर आलं आहे.


२०१२ साली गुटखाबंदी

राज्यात २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू झाली. गुटखाबंदी लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. त्यानुसार राज्यात गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखूच्या विक्रीसह उत्पादनावर पूर्णपणे बंदी आहे. या कायद्याची 'एफडीए' कडून कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही छुप्या पद्धतीने खुटखा आणि तंबाखू राज्यात येतच आहे.



१५ लाखांचा माल जप्त

एफडीएच्या बृहन्मुंबई (अन्न) विभागानं घेतलेल्या विशेष मोहिमेत मुंबईत छुप्या पद्धतीनं दुकानं, पान टपऱ्या आणि कारखान्यात गुटख्याची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या मोहिमेंतर्गत 'एफडीए'नं सुमारे १५ लाख किंमतीचा गुटखा, सुगंधित सुपारी-तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. एवढंच नाही, तर गुटखा विक्री करणाऱ्या ८१ दुकानं सिलबंद केली आहे. या प्रकरणी ८९ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.



धाबे दणाणले

२४ आणि २५ मे रोजी एफडीएनं विशेष मोहिमेंतर्गत नळबाजार, डोंगरी, धारावी, साकीनाका, चेंबूर, कुर्ला आदी ठिकाणी छापे टाकले असताना प्रतिबंधित गुटखा आणि तत्सम पदार्थांची विक्री करत होत असल्याचं निदर्शनास आलं. या मोहिमेत 'एफडीए'ला आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकांचीही मदत मिळाली. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे आणि छुप्या पद्धतीनं गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणतील, असा दावा यानिमित्तानं एफडीए आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी केला.


गुजरात ठरतंय डोकेदुखी

गुजरात आणि कर्नाटकामधून गुटख्याची तस्करी सुरू आहे. कर्नाटकातून येणाऱ्या गुटख्याचं प्रमाण तसं कमी आहे, पण सर्वाधिक गुटखा तस्करी ही गुजरातमधून होते. रस्ते आणि रेल्वे मार्गानं गुजरातमधून गुटखा येत असून ही तस्करी रोखण्यासाठी 'एफडीए'कडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पण, रेल्वे प्रशासन आणि गुजरात 'एफडीए'कडून म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्यानं महाराष्ट्र 'एफडीए'च्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत.



हेही वाचा-

तुम्हाला, पाणीपुरी आवडते? मग हे वाचाच!

तुम्ही घाण पाण्याची आईस्क्रिम तर खात नाहीय ना?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा