अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा

३५ जणांनी अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर अमिताभ यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत आंदोलन केले. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

SHARE

मेट्रोला समर्थन दिल्याप्रकरणी बीग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर निदर्शने करणाऱ्या २३ तरूणांना जुहू पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेत त्यांना अटक केली. त्या ठिकाणी निदर्शनास उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींचा पोलिस आता शोध घेत आहेत.

आरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील, आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण होतं. मात्र नागरिकांचा विरोध असतानाही बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आरेतील मेट्रो प्रकल्पाला पाठिंबा म्हणून  ‘वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत माझ्या एका मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. वेगवान, सोयीस्कर आणि कार्यक्षम मेट्रोने ते प्रभावित झाले. प्रदूषणासाठी उपाय.. अधिकाधिक झाडे लावा, मी माझ्या बागेत वृक्षारोपण केलं आहे, तुम्ही केलं का?,’ असे ट्विट बिग बींनी केलं. अमिताभ यांच्या या ट्विटमुळे मुंबईकर चांगलेच संतापले. एकीकडे मुंबईकरांनी अमिताभ यांना ट्विटरवर ट्रोल केलं. तर दुसरीकडे गुरूवारी सकाळी ३० ते ३५ जणांनी अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर अमिताभ यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत आंदोलन केलं. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आंदोलनकर्त्यांनी ‘जे काम जंगल करते, ते बगीचे करू शकत नाही,’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन बिग बींच्या ट्विटचा निषेध केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अर्ध्याहून अधिक आंदोलनकर्त्यांनी पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी २३ जणांना अमिताभ यांच्या बंगल्याबाहेरून ताब्यात घेतलं. या २३ जणांवर जुहू पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कलम ३७,१३५ नुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा - 

मुंबईतून ३३ लाखांचा गुटखा जप्त

महाराष्ट्र एटीएसला आंध्रप्रदेश सरकारकडून ८ लाखांचं बक्षीस
संबंधित विषय
ताज्या बातम्या