श्रीनिवासन यांची मोदींच्या वकिलाकडून उलट तपासणी


श्रीनिवासन यांची मोदींच्या वकिलाकडून उलट तपासणी
SHARES

गैरव्यवहारप्रकरणी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी याच्याविरोधात अंमलबाजवणी संचलनालया (ईडी)ने फॉरेन एक्‍सचेंज मॅनेजमेंट अॅक्‍ट(फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर बीबीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानुसार श्रीनिवासन सोमवारी 'ईडी'च्या विशेष संचालकांपुढे हजर झाले. या प्रकरणी मोदीचे वकील मेहमूद अबिदी यांनी श्रीनिवासन यांची उलट तपासणी घेतली.


उलट तपासणीची मागणी

आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी मोदी परदेशात पळून गेल्यानंतर ईडीने त्याच्या भोवती फास आवळ्यास सुरूवात केली. आपण निर्दोष असून आपल्याला जाणून बुजून कुणीतरी या प्रकरणात गोवत असल्याचं स्पष्टीकरण मोदीने अनेकवेळा दिलं होतं. त्यानुसार मोदीच्या वकिलांनी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची उलट तपासणी घेण्याची परवानागी द्यावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


याआधी कुणाची हजेरी?

ही याचिका मंजूर करून न्यायालयाने उलट तपासणीसाठी परवानगी दिली. या आदेशानुसार बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची मोदीच्या वकीलांकडून उलट तपासणी सुरू आहे. श्रीनिवासन यांच्याअगोदर बीसीसीआयचे पदाधिकारी चिरयू अमिन, डॉ. रत्नाकर शेट्टी, शशांक मनोहर व प्रसन्ना कनन यांची देखील मोदीचे वकील यांनी उलट तपासणी घेण्यात आली आहे.


उत्तर देण्याचं टाळलं

श्रीनिवास सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बेलार्ड पिअर येथील कार्यालयालयात आले होते. साडेपाच वाजेपर्यंतही त्यांची उलट तपासणी करण्यात आली. त्यात श्रीनिवासन यांनी अडचणीच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घटना जुनी आहे, काहीच आठवत नसल्याचं पालुपद श्रीनिवासन यांनी लावल्याचं मोदीच्या वकिलांनी सांगितलं. ही उलट तपासणी १३ मार्चपर्यंत चालणार आहे.


काय आहे प्रकरण?

२००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल सामन्यांसाठी आरबीआयची कोणतीही परवानगी न घेता २५३.४५ कोटी रुपये पाठवण्यात आल्याच्या आरोपाखाली ईडीने २०११ मध्ये 'फेमा' कायद्या अंतर्गत मोदी व बीसीसीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावेळी हे पैसे हस्तांतरण करण्याचा निर्णय संपूर्णपणे बीसीसीआयचा होता, असा दावा मोदीने केला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा