खड्ड्यांनी घेतला चार महिन्यांच्या मुलाचा बळी


खड्ड्यांनी घेतला चार महिन्यांच्या मुलाचा बळी
SHARES

मुंबईतील खड्डे आणि बेशिस्त वाहन चालक यामुळे अपघातात एका चार महिन्याच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजता दादर पूर्व येथे घडली. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यामुळे नियंत्रण सुटलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी संतोषकुमार श्रीसुर्यदिन कोल (२८) या टेम्पो चालकास अटक केली आहे.


तिघे गंभीर जखमी

दक्षिण मुंबईत राहणारे मोहम्मद शेख हे दादरच्या डाॅ. जग्गनाथ शंकर शेट उड्डाण पुलावरून दुचाकीने भायखळाच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या दुचाकीवर मागे पत्नी सबा शेख, चार महिन्यांचा मुलगा साद शेख आणि तीन वर्षांची मोठी मुलगी मायशा शेख बसले होते. भरधाव वेगात उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात शेख यांची गाडी गेल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी मागून येत असलेल्या टेम्पोने शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होत की, चार महिन्याच्या सादचा जागेवरच मृत्यू झाला. तर सबा, मायशा आणि शेख यांना गंभीर दुखापत झाली आहे. या सर्वांवर परळच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा - 

शक्ती मिल गँगरेप प्रकरणात १४ जानेवारीला निर्णय

तेलतुंबडे, नवलखा यांना अटकेपासून दिलासा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा