बनावट संस्थेच्या नावाने १९४ कोटी उकळले


बनावट संस्थेच्या नावाने १९४ कोटी उकळले
SHARES

मुंबईत बनावट संस्था स्थापन करून नागरिकांकडून रिसर्चच्या नावाखाली तब्बल १९४ कोटी रुपये उकळणाऱ्या संस्थेचा आयकर विभागाने पर्दाफाश केला आहे. आयकरने या संस्थेची कागदपत्रे पडताळली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आयकरच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.


रिसर्चसाठी देणग्या

अरविंदो इन्स्टिटयुट ऑफ अॅप्लाईड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट या नावाने उमेश चापसी नागडा यांच्यासह सहकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेची २०१६-१७ ची  आर्थिक जमा खर्चाची कागदपत्रे पडताळणीसाठी लालबाग येथील आयकर विभागाकडे देण्यात आली होती. या कागदपत्राच्या पडताळणीदरम्यान उमेश चापसी नागडा आणि सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या सदस्यांनी संस्थेतर्फे रिसर्चसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून देणग्या स्विकारल्याचं आढळून आलं.


खोटं सर्टिफिकेट 

जे सर्टिफिकेट दाखवून देणग्या घेतल्या ते सर्टिफिकेट खोटे असल्याचा संशय आयकर अधिकाऱ्यांना आला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सायंटिफिक रिसर्च मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. या विभागाने श्री अरविंदो इन्स्टिटयुट ऑफ अॅप्लाईड सायंटिफिक रिसर्च ट्रस्ट ही अस्तित्वात नसून त्यांनी सादर केलेले सर्टिफिकेट खोटे असून त्यांच्या विभागाकडून असं कोणतंही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नसल्याचं कळवलं. 


५८ कोटींचा आयकर बुडवला

या माहितीनंतर आयकर अधिकाऱ्यांनी श्री अरविंदो इन्स्टिटयुट ऑफ अॅप्लाईड सायंटिफिक रिसर्च ट्रस्टच्या बँक खात्याची पडताळणी केली असता ट्रस्टची आतापर्यंत १९४ कोटी ६७ लाख ८ हजार ९७३ रुपयांची उलाढाल झाल्याचं आढळून आले.  ट्रस्टने सादर केलल्या विवरण पत्राची सखोल पडताळणी करून सदर ट्रस्ट खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर आयकर विभागाकडे संस्थेेने मागितलेली कर सुट रद्द केली. ट्रस्टने खोटे प्रमाणपत्र देऊन ५८ कोटी ५९ लाख रुपयांचा आयकर न भरता केंद्र शासनाची फसवणूक केल्याचं उघडकीस आल्यानंतर भोईवाडा पोलिस ठाण्यात ट्रस्टचे ट्रस्टी आणि इतर सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



हेही वाचा - 

पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक

विवाहितेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा