तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा सराईत गुन्हेगार अटकेत


तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा सराईत गुन्हेगार अटकेत
SHARES

कांदिवलीतल्या समता नगर परिसरातील सिंग इस्टेट येथे राहणारा आणि घरफोडी, लैंगिक अत्याचारासहित इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी मनोहर उर्फ मन्या शिंदे (21) याला गजाआड करण्यात समता नगर पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान मन्या दोन साथीदारांसोबत ठाकूर व्हिलेजमधील सिंग इस्टेटमध्ये सुमीत दास यांच्या कारच्या बोनेटवर बसून दारू पित होता. याचवेळेस सुमीत दास तेथे आले आणि त्यांनी मन्याला कारच्या बोनेटवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यावर मन्या याने त्यांना 'मी कोण आहे हे तुला माहित नाही', असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

ही घटना घडत असताना मन्याला ओळखणारे काही तरूण जवळच उभे होते. त्यापैकी काही तरूणांनी दोघांच्या भांडणात हस्तक्षेप करून सुमीत दास यांना शांत केले. तेवढ्यात मन्या 'तुम्हाला आता दाखवतोच' म्हणून तेथून निघाला आणि दहा मिनिटांच्या आत आपल्या साथीदारांना घेऊन पुन्हा परतला. यावेळी त्याने झगडा सोडविणाऱ्या वैभव गावडे या तरूणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने 3 ते 4 वार केले. या घटनेची माहिती तात्काळ समता पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या गावडे याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले तेथे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफीसर नेत्रा मुळे यांनी आरोपी मन्या याला अटक करून त्याच्यावर भादंविच्या 307, 34, 504, 506 (2), 37 आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा