निवृत्त कर्मचाऱ्यांचा विमा योजनेतील औषधांवर डल्ला

मुलुंडच्या राज्य कामगार विमा योजनेंतर्गत रुग्णालयासाठी मागवण्यात आलेल्या औषधांच्या मूळ किमती वाढवून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांचा विमा योजनेतील औषधांवर डल्ला
SHARES

मुलुंडच्या राज्य कामगार विमा योजनेंतर्गत रुग्णालयासाठी मागवण्यात आलेल्या औषधांच्या मूळ किमती वाढवून कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे शासनाचं १ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झालं असून याप्रकरणी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मुलुंड येथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ. गणेश शंकरराव जाधव यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यातील ८ जण हे सेवा निवृत्त झाले असून १ आरोपी अद्याप कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


कसं आलं प्रकरण उघडरकीस?

रुग्णालयात काम करणाऱ्या राधेशाम लक्ष्मीपती बोगा यांनी २३ जुलै रोजी सेवा निवृत्तीचा लाभ मिळण्याबाबत मॅट कोर्टात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने शासनामार्फत अहवाल मागवला. बोगा यांच्या प्रकणाची माहिती मिळवत असताना राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे २०११ ते २०१७ पर्यंत कार्यरत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी श्रीहरी दोनतुल्ला, राजकुमार शाक्यवार, गुंडेराव वळसे, राजेंद्र घारे, नारायण येमुल्ला, एस.बी. शेट्टी, जनार्धन रामपल्ली, राजेशाम बोगा आणि सध्या कार्यरत असलेले विलास चौरागडे यांनी औषधी पत्रकांमधील ठरावीक मागवण्यात आलेली महागड्या औषधांच्या छापील किंमतीमध्ये खाडाखोड करून किंमती वाढवल्या.

हे तत्कालिन वैद्यकीय अधीक्षक भारती सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब वैद्यकीय अधिक्षक डाॅ. गणेश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली.


चौकशीचे आदेश

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर डॅा. जाधव यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये वैद्यकीय आयुक्तांना या गैरव्यवहाराप्रकरणी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आयुक्तांनी एक समिती नेमत १५ दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर केला. या चौकशीत रुग्णालयातून मागवण्यात आलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची तपासणी केली असता  त्यामध्ये महागडी औषधं इंजेक्शन नोवोमिक्स, ह्युमलाॅग, टॅब्लेट जानुव्हिआ, जानूमेट, गॅल्वस, एल्ट्राॅक्सीन, नॅट्रिलएम या औषधांच्या प्रिस्क्रिपशनमध्ये खाडाखोड करून डोस वाढवण्यात आलं.

वाढवण्यात आलेले डोस हे जर रुग्णांना दिले असते, तर रुग्ण दगावण्याची शक्यताही होती. सर्व आरोपींना २०११ ते २०१७ या कालावधीत हा गैरव्यवहार करत शासनाचे १ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान केल्याचं निदर्शनास आल्यानंतर डाॅ. गणेश जाधव यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ९ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  


हेही वाचा -

मालेगाव होतं पुन्हा टार्गेटवर



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा