फ्लॅशबॅक २०१८: मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय

शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून, फूस लावून आणलेली मुलं, महिला मुंबईत आहेत. पण मुंबईतून बेपत्ता झालेले अनेक जण देशाच्या कोनाकोपऱ्यात तसंच आखातात लुप्त झाले आहेत. त्यांची स्वतःच्या सुटकेसाठी असह्य धडपड सुरू असेल. त्यांच्या पालकांचा आजही आक्रोश सुरू असेल. मात्र, पोलिस आणि राज्य सरकार याबाबत फार गंभीर दिसत नाही. मात्र, हेच प्रकरण जर उच्चभ्रू वस्तीतील असेल तर पोलिस अपार मेहनत करतात.

फ्लॅशबॅक २०१८: मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय
SHARES

मुंबईसारख्या विस्तीर्ण व सुमारे सव्वा कोटी लोकसंख्येच्या शहरात लहान मुलं-मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुले म्हणजे देशाचे भवितव्य, असं मानणाऱ्या देशात बेपत्ता होणाऱ्या कारणांचा वेळीच शोध घेतला नाही तर ही समस्या कुठलं टोक गाठेल हे सांगता येणार नाही.


न्यायालयानं फटकारलं

शहरात बेपत्ता मुले-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणं आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं जाण्याचं वास्तव आजही आहे. या मुलांचं अपहरण करणाऱ्या सक्रीय टोळ्यांचा डाव अनेकदा पोलिसांनी उधळून लावला. मात्र, काही दिवसांनी पोलिसांनी त्या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्यानंतर हे अपहरणकर्ते पुन्हा सक्रीय होतात. बेपत्ता झालेल्या लोकांची वाढती संख्या पाहून न्यायालयानेही पोलिसांना अनेकदा फटकारलं आहे. 


रोज ५ मुली बेपत्ता

वर्ष २०१८ मध्ये आॅक्टोंबरपर्यत ११९६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ९२४ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. मात्र, ५०२ हून अधिक मुली अद्याप बेपत्ता आहेत. अनेक बेपत्ता मुलींची पोलिस ठाण्यात नोंद करण्याची तसदीही त्यांच्या घरातले घेत नाहीत. मागील वर्षी याच महिन्यांमध्ये बेपत्ता मुलींची संख्या ८६८ होती. अल्पवयीन मुलांचं बेपत्ता होण्याचं हे वाढलेले प्रमाण लक्षात घेता दररोज ५ मुली बेपत्ता होत असल्याचं दिसून येतं.


पोलिसांचा दुटप्पीपणा

शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून, फूस लावून आणलेली मुलं, महिला मुंबईत आहेत. पण मुंबईतून बेपत्ता झालेले अनेक जण देशाच्या कोनाकोपऱ्यात तसंच आखातात लुप्त झाले आहेत. त्यांची स्वतःच्या सुटकेसाठी असह्य धडपड सुरू असेल. त्यांच्या पालकांचा आजही आक्रोश सुरू असेल. मात्र, पोलिस आणि राज्य सरकार याबाबत फार गंभीर दिसत नाही. मात्र, हेच प्रकरण जर उच्चभ्रू वस्तीतील असेल तर पोलिस अपार मेहनत करतात. पण सर्वसामान्य घरातील बेपत्ता मुलं, मुली आणि महिलांसाठी फारसे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. 


वेश्या व्यवसाय, घरकामात वापर

 मुंबईतून दररोज अनेक जण बेपत्ता होतात. रस्ता चुकलेले, घरातून रागावून गेलेले, प्रियकरासोबत पळून गेलेले, गर्दीत हरवलेले काही दिवसांनी सापडतात. अनेकांचा शोध लागतच नाही. अल्पवयीन मुलांना पळवणारी, तरुणींना फूस लावून पळवणारी टोळी मोठ्या प्रमाणात मुंबईत सक्रीय आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये लक्ष घालताना मुंबई पोलिस फारसे गंभीर नसल्याचं दिसतं. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये बहुतांशी जण १८ ते ४९ वर्ष वयोगटातील आहेत. त्यांचा वापर देह व्यापारात, आखाती देशातील वेश्या व्यवसायात आणि उर्वरितांचा घरकामासाठी केला जातो. 


शस्त्रक्रियेद्वारे बदल 

गेल्या २ वर्षात हजारो महिला बेपत्ता झाल्या अाहेत. मुलांना परदेशात घरकामांना किंवा कंपनींमध्ये पाठवलं जातं. तर काहींना अपंग बनवून भीक मागण्यास लावलं जातं. अल्पवयीन मुलींना विशिष्ट औषधे देऊन तसंच शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीर रचनेत बदल करून वेश्या व्यवसायात ढकललं जातं. मात्र, शरीरात करण्यात आलेल्या बदलांमुळे त्यांची आयुर्मयादा कमी होऊन, त्यांचा तरुण वयातच मृत्यू होतो. तर वेश्या व्यवसायात होणाऱ्या शोषणातून त्या अनेक आजारांनाही बळी पडतात.


मुली अाणणारे दलाल

गावाकडील दलाल मुलींच्या कुटुंबाच्या परिचयाचे असतात. राज्याबाहेरून ह्या मुली अाणल्या जातात.  दारिद्रय, बेरोजगारी, मोठे कुटुंब, कुपोषण, अतिपाऊस वा दुष्काळ अादी कारणांमुऴे अाई-वडील मुलींना पाठवण्यास तयार होतात. तसंच दलाल या मुलींच्या आई - वडिलांच्या मनात मुंबईतल्या जगण्याचेंएक शानदार चित्र निर्माण करतात. मुंबईत सुरुवातीला काढलेले फोटो तो मुलीच्या अाई - वडिलांना दाखवत राहतो. त्या कुटुंबाचा विश्वास मिळवून, या फसव्या जाळ्यात गुंतलेले पालक मुलींना त्यांच्यासोबत पाठवतात. तर अनेकदा दुसऱ्या मुलींनाही याच दुष्टचक्रात ढकलतात. पुन्हा त्या गावाकडे तोंड दाखवत नाही. दलाल त्या गावचा असेल तर मुलींची ख्याली खुशालीची पत्रे, पाठवून पालकांची फसवणूक करत असतो. 


बांग्लादेशमधील मुली

नोटबंदीनंतर मालाड, मालवणी, कुरारसारख्या भागातील काच कारखान्यांमधील तसंच धारावीतील मुलींचं करायचं काय असं म्हणत कारखान्यांसाठी आणलेल्या या मुली कामाठीपु-याच्या रस्त्यावरही विकल्या गेल्याचं भीषण वास्तव तपासात पुढं आलं आहे. शहरातल्या वेश्या व्यवसायावर एक नजर टाकल्यास त्यामधील अनेक मुली या पश्चिम बंगाल, म्यानमार, ओडिशा आणि बांग्लादेश येथील आहेत. 


भविष्य अंधारातच

घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक दलाल त्यांना मुंबईला चांगल्या पगाराच्या नोकरी देतो, शिक्षणासाठी नेतो असं सांगून घेऊन येतात. या दलालांनी त्यांना वेश्या व्यवसायात ढकलल्याचं तपासात पुढं आलं आहे. अनेकदा शहरातील या दलालांच्या तावडीतून सुटका केलेल्या मुलींना त्यांच्या घरातले स्विकारत नाहीत. आणि स्विकारलेच तरी त्यांच्याशी लग्न करण्यास कुणीही पुढं येत नाही. त्यामुळे त्यांच भविष्य काळोख्या अंधारातच जातं.


बहरीनला तस्करी 

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतंच मुलींची भारतातून बहरीनला तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत ६०० हून अधिक महिलांना परदेशातील वेश्या व्यवसायात ढकलल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी टिंकू राज याच्या घरात परदेशात पाठवण्यात येणाऱ्या ६० महिलांचे पासपोर्ट आढळून आल्याने या महिलांना परदेशात पाठवण्याआधीच रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवघ्या काही लाख रुपयांत बहरीन येथील वेश्या व्यवसायात महिलांना ढकलणाऱ्या या टोळीमागे एका तृतीयपंथी आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचं तपासात पुढं आलं.  


३ महिन्यात २० लाख

बहरीन येथील वेश्या व्यवसायात अडकलेल्या नागपाडा येथील २४ वर्षीय महिलेची पैसे भरून तिच्या कुटुंबियांनी सुटका केल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने या टोळीतील मुंबईत वास्तव्यास असलेले मोहम्मद शेख (५६), टिंकू राज (३६) या दोन हस्तकांसह एकाला नुकतीच अटक केली आहे. टिंकू हा तृतीयपंथी प. बंगाल, राजस्थान, उडिसा, नेपाळ या ठिकाणी आर्थिक स्थिती बेताची असलेल्या महिलांना हेरायचा. त्यांची ३ महिन्यांसाठी ३ ते ४ लाख रुपयांत खरेदी करायचा. या ३ महिन्यांत हव्या त्या वेळेला तो बहरीन येथील नागरिकांकडे त्यांना शरीरसुखासाठी पाठवायचा. या ३ महिन्यांत त्यांच्याकडून ही टोळी १५ ते २० लाख रुपये कमवायची.


विशेष कारवाई

या वर्षातील जून महिन्यापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८९ गुन्हे नोंदवले असून लहान मुलांना कामावर ठेवल्याप्रकरणी १७९ मालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातून २५२ मुली व मुलांची सुटका करण्यात आली आहे. तसंच मुलांना भीक मागायला प्रवृत्त करणाऱ्या ३९ जणांना अटक करून ७२ मुलांची सुटका समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी केली आहे.



हेही वाचा - 

फ्लॅशबॅक २०१८- ड्रग्ज तस्करांसाठी मुंबई 'गोल्डन ट्रँगल'




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा