रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक

चौकडीने पैसे घेतल्यानंतर १८ जणांना काही दिवसातच रेल्वेचे अपाॅइंटमेंट लेटर, पोस्टिंग लेटर, पेमेंट स्लिप, आणि ओळखपत्रही पोस्टाने पाठवले.

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून १८ जणांची ७० लाखांना फसवणूक
SHARES

रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीने मुंबईसह राज्यातील १८ तरुण-तरुणींना ७० लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव राय आणि सिमा पवार या चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गोरेगाव पोलिसांनी हा गुन्हा अधिक तपासासाठी गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांकडे वर्ग केला आहे.


टीसीच्या नोकरीचं आमिष

 देशभरात सध्या रेल्वे भरतीसाठी अनेकांनी अर्ज केले असताना भुरट्या चोरांनी मात्र संधीचा फायदा घेऊन, कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा गोरख धंदाच सुरू केला आहे. ऐरोली परिसरात राहणारे तक्रारदार सखाराम लांडगे हे कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात होते. त्यांनी रेल्वे भरतीतही फाॅर्म भरला होता. त्याच वेळी त्यांची ओळख राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव राय आणि सिमा पवार यांच्याशी झाली. चौघांनी रेल्वेत ओळखीवर पैसे भरून तिकिट तपासणीसपदी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लांडगे यांनी त्याच्यासह त्यांच्या १८ मित्रांचे मिळून ७० लाख रुपये आरटीजीएसटीद्वारे या चौघांकडे जमा केले.


बोगस कागदपत्रे पाठवली

या चौकडीने पैसे घेतल्यानंतर १८ जणांना काही दिवसातच रेल्वेचे अपाॅइंटमेंट लेटर, पोस्टिंग लेटर, पेमेंट स्लिप, आणि ओळखपत्रही पोस्टाने पाठवले. एवढेच नव्हे तर त्या १८ जणांना विश्वास पटावा, त्यासाठी आरोपींनी इंटरनेटवर रेल्वेची बनावट बेवसाईटही बनवून त्यावर या १८ जणांचे सिलेक्शन झाल्याची यादी जाहीर केली.  मात्र यातील एका तरुणाने रेल्वेच्या सीएसटी येथील कार्यालयात काही त्रुटीबाबत संपर्क साधला असता रेल्वेने अशा प्रकारे कुठलीही नियुक्तीची यादी जाहीर केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर चौकशीत या चौघांनी फसवणूक केल्याचे कळाल्यानंतर सखाराम लांडगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


परराज्यातील मुलांचीही फसवणूक

तपासात या चौघांनी मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तरप्रदेश, कोलकत्ता येथीलही अनेक मुलांना अशा प्रकारे फसवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी या चौघांवर भा.द.वि कलम ४१९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४७३, ४७५, १२०(ब) सह कलम ६६(क), ६६(ड) माहिती व तंत्रज्ञान कायदा सन २००० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा ११ चे पोलिस करत आहेत.



हेही वाचा -

आंब्याच्या १०९ पेट्या परस्पर विकून देवगडच्या व्यापाऱ्याची फसवणूक

हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी चौथी अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा